रमेश कदम यांनी केली काँग्रेसशी गद्दारी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 एप्रिल 2019

एक नजर

  • काँग्रेस जिल्हाध्यक्ष रमेश कदमांची लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाशी गद्दारी
  • आघाडीच्या उमेदवाराचे आलेले प्रचारसाहित्य कार्यकर्त्यांपर्यंत जाणीवपूर्वक पोहोचवले नसल्याचा आरोप.
  • कदम व त्यांच्या समर्थकांनी केले दुसऱ्या पक्षाचे काम. 
  • कदमांनी पक्षविरोधी कारवाईची परंपरा कायम जपली. यामुळे कदम यांची जिल्हाध्यक्षपदावरून व पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी.

चिपळूण - काँग्रेस जिल्हाध्यक्ष रमेश कदमांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाशी गद्दारी केली. आघाडीच्या उमेदवाराचे आलेले प्रचारसाहित्य कार्यकर्त्यांपर्यंत जाणीवपूर्वक पोहोचवले नाही. कदम व त्यांच्या समर्थकांनी दुसऱ्या पक्षाचे काम केले. कदमांनी पक्षविरोधी कारवाईची परंपरा कायम जपली. यामुळे कदम यांची जिल्हाध्यक्षपदावरून व पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी काँग्रेसप्रेमींनी वरिष्ठांकडे केली आहे.

माजी उपनगराध्यक्ष लियाकत शहा यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.लोकसभा निवडणुकीत रमेश कदमांनी केलेल्या पक्षविरोधी कारवाईबाबत शहा म्हणाले, कदम राष्ट्रवादीत असतानाही पक्षविरोधी काम करायचे. राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत त्यांनी शेकापमध्ये प्रवेश करीत लोकसभा निवडणूक लढवली. तेथेही शेवटच्या टप्प्यात राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंना मते देण्याचे आवाहन केले होते.

शेकापला सोडचिठ्ठी देत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतरच्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांनी भाजप उमेदवारांच्या विरोधीच काम केले. भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. माजी आमदार असल्याने पक्षाला चांगले दिवस येतील अशी कार्यकर्त्यांना आशा होती. मात्र लोकसभा निवडणुकीत त्यांनी पक्षाला अंधारात ठेवून नियोजनबद्ध कट रचला. प्रचार साहित्य आले तरी ते शहर अथवा ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचू दिले नाही. निवडणुकीतील पक्षाची सर्व यंत्रणा खिळखिळी करून ठेवली.

समर्थक कार्यकर्त्यांना सांगून आघाडीचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर यांचा प्रचार करू दिला नाही. पक्षातर्फे निवडणुकीसाठी निधी आला. पण तो पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यापर्यंत पोहोचलाच नाही. पक्षाच्या कार्यकर्त्यांना पुरेशी यंत्रणा पुरवली नाही. त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी दुसऱ्या पक्षाचे बूथ लावले. बांदिवडेकर विजयी होणार नाहीत, असे सांगून काँग्रेस पक्षाची मते दुसऱ्या पक्षाला फिरवली. याबाबत प्रदेश कार्यकारिणीकडे तोंडी तक्रार दिली आहे. २९ एप्रिलनंतर लेखी तक्रार देणार आहोत, असे शहा यांनी सांगितले. 

राष्ट्रवादीने आघाडीचा धर्म पाळला नसल्याची तक्रार

बांदिवडेकर हे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे अधिकृत उमेदवार होते. काँग्रेसचा उमेदवार असतानाही मित्रपक्ष राष्ट्रवादीने आघाडीचा धर्म पाळला नाही. याचीही तक्रार प्रदेश कार्यकारिणीकडे केली आहे. आघाडीत विधानसभेला चिपळूण मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहे. त्यामुळे काही महिन्यांत मित्रपक्षावर पण वेळ येणार आहे. याची जाणीव त्यांनी ठेवावी, असे शहा यांनी सुनावले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ramesh Kadam has betrayed Congress