राणेंनी आता पक्ष बदलल्याप्रमाणे त्यांची भूमिकाही बदलली - सतीश सावंत

सतिश सावंत; शिवसेनेवर केलेल्या टिकेला उत्तर
 शिवसेना नेते सतीश सावंत
शिवसेना नेते सतीश सावंत sakal

कणकवली: राजापूर नाणार येथील ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला जनतेचा विरोध होता म्हणून लोकभावनेचा विचार करून शिवसेनेने या प्रकल्पाला विरोध केला. भाजपचे आमदार नितेश राणे जी टीका करत आहेत तो त्यांचा बुद्धिभेद आहे. काँग्रेस आणि त्यानंतर स्वाभिमान पक्षात असताना ग्रीन रिफायनरीमुळे स्थानिकांना कॅन्सरसारख्या रोग होईल, असे ते ठासून बोलत होते. तेव्हा रिफायनरी रद्द केल्याशिवाय गप्प राहणार नाही, अशी त्यांची भूमिका होती. आता पक्ष बदलल्याप्रमाणे त्यांची भूमिकाही बदलत गेली आहे. त्यांनी आपली पहिली भूमिका जनतेसमोर ठेवावी, अशी प्रति टीका शिवसेना नेते सतीश सावंत यांनी आज येथे पत्रकार परिषदेतून केली.

इतर गावात रिफायनरी प्रकल्पाला पाठिंबा असेल आणि हा प्रकल्प आपण मार्गी लावू, असे आमदार राणे यांनी नुकतेच जाहीर केले होते. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी केलेल्या विकासकामांवरही त्यांनी टीका केली होती. या टीकेला उत्तर देण्यासाठी श्री. सावंत यांनी आज येथे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी नगरसेवक कन्हैया पारकर, शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले, सचिन सावंत, संतोष पबर, राजू शेट्ये आदी उपस्थित होते. श्री. सावंत म्हणाले, "नितेश राणे यांची दुटप्पी भूमिका कायम राहिली आहे. जसे पक्ष बदलत गेले तशी भूमिका बदलत गेली. तेव्हा देवगड येथील आपल्या भाषणात रिफायनरीमुळे कॅन्सर होईल. तसे होऊ देणार नाही अशी त्यांची भूमिका होती

प्रमोद जठार हे रिफायनरीचे दलाल होते असे नितेश राणे म्हणत होते. आता त्यांची भूमिका बदलली आहे. मुळात रिफायनरीमुळे पर्यावरण धोक्यात येणार आहे. त्यामुळे देवगडचा आंबा बागायतदार उध्वस्त होणार आहे. त्यामुळे राणेंनी आंबा बागायतदारांचे मतपरिवर्तन करून दाखवावे. पक्षाच्या झेंड्याप्रमाणे त्यांचे रंग नेहमीच बदलत गेले आहेत. त्यामुळे त्यांनी शिवसेनेवर टीका करू नये. त्यांना जशातसे उत्तर दिले जाईल. शिवसेना जनतेसोबत राहिले आहे. जनता शिवसेनेला विसरणार नाही. त्यावेळी नितेश राणे रिफायनरीला घातक म्हटले होते आणि तेही टाहो फोडून सांगत होते."

श्री. सावंत म्हणाले, "पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी शासनाच्या निधीतून मंजूर झालेल्या कामांची भूमिपूजन केली आहेत; मात्र केंद्रात भाजपचे सरकार असताना नितेश राणे हे केंद्राकडून एक रुपयाचा निधी आणू शकलेले नाहीत. ते केवळ दुसऱ्यांवर टीका करत आहेत. देवगडबाबतचे नितेश राणे यांचे व्हिजन काय ते जाहीर करावे. याउलट पर्यावरण मंत्री ठाकरे यांनी किनारपट्टीच्या पर्यटन विकासासाठी नव्या योजना आणल्या आहेत. राणेंनी केवळ दुसऱ्यावर टीका करणे, ज्या पक्षात जातील त्या पक्षाच्या विरोधातील पक्षाच्या नेत्यावर बोलणे असे सोयीस्करपणे ते वागत आहेत. स्वतःच्या स्वार्थासाठी नितेश राणे हे आपली भूमिका बदलत राहिले आहेत. त्यांना दुसऱ्यांवर बोलण्याचा अधिकार राहिलेला नाही."

मला मैदाना बाहेर ठेवल्याने सत्ता गेली; पण देवगड नगरपंचायतीची सत्ता आम्ही केव्हीही बदलु शकतो, असे नितेश राणे म्हणाले. यावर बोलताना सावंत म्हणाले, "त्यांनी देवगडची सत्ता बदलून दाखवावी. जनाधार त्यांच्या विरोधात आहे. बँकेची कर्ज भरतो असे सांगून ते पक्षप्रवेश करून घेत आहेत. त्यांनी जे कृत्य केले. त्यामुळे न्यायालयाने त्यांना मैदानाबाहेर ठेवले. जर देवगडचा विकास केला असता तर त्यांच्या पक्षाचा पराभव झाला नसता. मनी आणि मसल पॅावरमुळे सत्ता मिळावणे हे नितेश राणेंना जमते, त्यांनी जनतेचा खरा जनाधार मिळवावा."

स्वागत करण्याची ती प्रवृत्ती चुकीची

नितेश राणे यांना संतोष परब हल्लाप्रकरणी न्यायालयाने कणकवली तालुक्यात प्रवेशासाठी घातलेली बंदी उठल्यावर त्यांच्या कार्यकर्त्यांनी स्वागत केले; मात्र जनतेच्या हितासाठी झालेल्या डंपर आंदोलनात दोषमुक्त झाल्यानंतर स्वागत झाले नाही. यावरून लक्षात येते की, चुकीच्या पद्धतीने कार्यकर्त्यांनकडून आपले स्वागत करून घेतले जात आहे. ही पद्धतच मुळात चुकीची आहे. हा पायंडा जिल्ह्याच्या राजकारणासाठी घातक असल्याची टिकाही सतीश सावंत यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com