भाजपचे प्रवक्ते मधू चव्हाण यांच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 सप्टेंबर 2018

रत्नागिरी - मुंबई म्हाडाचे अध्यक्ष आणि भाजपचे प्रवक्ते मधू चव्हाण यांच्याविरुद्ध बलात्कार आणि फसवणूक केल्याचा गुन्हा चिपळूण पोलिस ठाण्यात नोंद झाला आहे. न्यायालयाच्या आदेशाने हा गुन्हा दाखल झाला.

रत्नागिरी - मुंबई म्हाडाचे अध्यक्ष आणि भाजपचे प्रवक्ते मधू चव्हाण यांच्याविरुद्ध बलात्कार आणि फसवणूक केल्याचा गुन्हा चिपळूण पोलिस ठाण्यात नोंद झाला आहे. न्यायालयाच्या आदेशाने हा गुन्हा दाखल झाला. चिपळूण पोलिस निरीक्षक श्री. पोळ यांनी याला दुजोरा दिला. राज्यातील राजकीय वर्तुळात यामुळे खळबळ उडाली आहे.

२००२ ते २०१६ या दरम्यान हा गुन्हा घडला आहे. एका संस्थेमध्ये कामाला असलेल्या महिलेने ही तक्रार केली आहे. आपल्या अधिकाराचा गैरवापर करून संबंधित महिलेला पत्नीचा दर्जा देण्याचे आमिष दाखवत वारंवार बलात्कार केल्याचा आरोप तक्रारीत आहे. यापूर्वी येथील पोलिस अधीक्षक कार्यालयात तक्रार अर्ज आले होते. मात्र ते अर्ज फाईल झाले. त्यामुळे संबंधित महिलेने न्यायालयात धाव घेतली.

न्यायालयाने याबाबतची पूर्ण शहानिशा केल्यानंतर संबंधितांवर ३७६, ४२० आदी कलमानुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार चिपळूण पोलिस ठाण्यात मधू चव्हाण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा रंगली आहे. 

दोन दिवस जिल्ह्यात या विषयाची खुमासदार चर्चा सुरू होती. एका राजकीय पुढाऱ्यावर गंभीर गुन्हा दाखल झाल्याचे बोलले जात होते. मात्र प्रत्यक्षात माहिती पुढे येत नव्हती. आज सायंकाळी सोशल मीडियावर याबाबतच्या पोस्ट सुरू होत्या. पोलिस दलाकडून याला सायंकाळी दुजोरा मिळाला.

न्यायालयाच्या आदेशाने मधू चव्हाण यांच्यावर बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. त्याची चौकशी सुरू आहे. 
-डॉ. प्रवीण मुंढे,
जिल्हा पोलिस अधीक्षक, रत्नागिरी

Web Title: rape crime against BJP spokesman Madhu Chavan