
राष्ट्रवादीत मानसन्मान मिळत नसल्यामुळे खोत पक्ष सोडत असल्याची चर्चा आहे.
चिपळूण (रत्नागिरी) : राष्ट्रवादी कॉंग्रेस अल्पसंख्यांक समाजाचे नेते मुबीन खोत पक्षात नाराज असल्याची चर्चा आहे. ते लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचीही चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादीत मानसन्मान मिळत नसल्यामुळे खोत पक्ष सोडत असल्याची चर्चा आहे.
मुबीन खोत यांचे भाऊ उद्योजक नासीर खोत हे शिवसेनेत सक्रिय आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत त्यांनी दापोली विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार योगेश कदम यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले. मुबीन खोत यांनीही शिवसेनेचे काम करावे, अशी त्यांची इच्छा होती तरीही मुबीन खोत यांनी चिपळूण मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार शेखर निकम यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले. मुस्लिमसह इतर समाजातील मते निकम यांना मिळावेत यासाठी त्यांनी प्रयत्न केले. विधानसभा निवडणुकीनंतर पक्षीय कार्यक्रमात कोणी विश्वासात घेत नाही. कार्यक्रमाचे निमंत्रण दिले जात नाही.
हेही वाचा - धक्कादायक ; रत्नागिरीत कौटुंबिक हिंसाचार घटनांमध्ये होतीये वाढ -
कार्यकर्त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठीही प्रयत्न होत नसल्यामुळे खोत यांनी राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत माहिती घेण्यासाठी खोत यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला; मात्र खोत हे शिवसेनेच्या संपर्कात असल्यामुळे त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. काही दिवसांपूर्वी त्यांनी युवा सेनेच्या कोअर कमिटीचे सदस्य आमदार योगेश कदम यांची भेट घेऊन शिवसेना प्रवेशाबाबत चर्चा केली. त्यानंतर सोशल मीडियावर खोत यांच्या सेनाप्रवेशाबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
"मुबीन खोत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते आहेत. त्यांच्यामागे युवा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. मुस्लिम समाजातही त्यांची प्रतिमा चांगली आहे. पक्षात त्यांना डावलण्याचा प्रश्नच येत नाही. त्यांची भेट घेऊन लवकरच त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल."
- शौकत मुकादम, प्रदेश उपाध्यक्ष, राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेल
"मुबीन खोत यांच्या शिवसेना प्रवेशाबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय होतील; मात्र ते शिवसेनेत आले तर चिपळूण तालुक्यातील युवासेनेला अधिकचे बळ मिळेल. आम्ही त्यांच्या स्वागतासाठी तयार आहोत."
- उमेश खताते, तालुकाधिकारी, युवा सेना चिपळूण
हेही वाचा - उपचाराला जात असताना दोघांना वाटेतच गाठले मृत्यूने -
संपादन - स्नेहल कदम