चार फितूर साक्षीदारांना शिक्षा, दंड 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 ऑगस्ट 2017

रत्नागिरी - कुवारबाव रेल्वेस्थानक येथे गर्दीच्या ठिकाणी रिक्षाचालकाच्या पोटात सुरी खुपसून खून झाला होता. या खटल्यात आरोपीला सात वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा झाली होती. खटल्यातील फितूर साक्षीदारांविरुद्ध न्यायालयाने नोटीस बजावली होती. महिनाभरातच जिल्हा न्यायालयाने निर्णय दिला. खटल्यातील चार फितूर साक्षीदारांना प्रत्येकी 500 रुपये दंड व कोर्ट उठेपर्यंत शिक्षा ठोठावली. 

अमर संजय शेठ (रा. एम. के. टॉवर, एसटी बसस्थानक), राजेंद्र पंढरीनाथ मजगावकर (रा. तेलीआळी), प्रशांत गोविंद बोरकर (रा. वेरीवाडी-चिंचखरी), धोंडिंबा राम खेत्री (रा. पाडावेवाडी- मिरजोळे) अशी फितूर साक्षीदारांची नावे आहेत. कुवारबाव रेल्वेस्थानक येथे 9 ऑक्‍टोबर 2015 ला रात्री खून झाला होता. फिर्यादी रिक्षाचालक हरिश्‍चंद्र गोविंद चव्हाण (वय 41, रा. रवींद्रनगर- कारवांचीवाडी) रेल्वेस्थानकात रिक्षा व्यवसाय करीत होते. तेथेच रिक्षाचालक प्रशांत बोरकर, धोंडिबा खेत्री, राजेंद्र मजगावकर, अमर शेठ यांच्याशी गप्पा, चेष्टामस्करी सुरू होती. त्या वेळी तेथे नितीन यशवंत पवार (रा. महादेवनगर, मिरजोळे) आला. त्याला वाटले, की गप्पा त्याच्याबाबत आहेत. त्यामुळे त्याने वाद सुरू केला. रिक्षाचालक हरिश्‍चंद्र चव्हाण याने समजावण्याचा प्रयत्न केला; मात्र पवारने शिवीगाळ करून जवळच्या वडापावच्या गाडीवरील सुरी घेऊन चव्हाणचा खून केला. 

शहर पोलिसांनी 29 डिसेंबर 2015 ला दोषारोपपत्र दाखल केले होते. खटल्याचा निकाल झाला. आरोपी नितीन पवारला सात वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली होती. रेल्वेस्थानक येथे गर्दीच्या ठिकाणी रात्री घडलेल्या खून प्रकरणातील अनेक साक्षीदार फितूर झाले. फितूर साक्षीदारांविरुद्ध न्यायालयाने (सीआरपीसी) कलम 344 प्रमाणे कारवाई का करू नये, अशी नोटीस काढली होती. साक्षीदारांनी न्यायालयात हजर राहून न्यायालयाला खोटा पुरावा दिला. आज या प्रकरणी निकाल झाला. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश जे. पी. झपाटे यांनी चार फितूर साक्षीदारांना कोर्ट उठेपर्यंत शिक्षा व प्रत्येकी पाचशे रुपये दंड ठोठावला. ऍड. विनय गांधी यांनी सरकारतर्फे काम पाहिले.

Web Title: ratanigiri news crime