esakal | रत्नागिरीत प्रशासनाकडून सुधारीत आदेश; हे राहणार सुरु

बोलून बातमी शोधा

Ratnagiri administration orders new rules in lockdown kokan marathi news

जिल्ह्यात शासनाच्या आदेशावरून गेल्या सोमवारपासून लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यानंतर शनिवार, रविवार कडक संचारबंदी लागू केली आहे. या दरम्यान जिल्हा प्रशासाने आणखी काही शिथिलता दिली आहे.

रत्नागिरीत प्रशासनाकडून सुधारीत आदेश; हे राहणार सुरु

sakal_logo
By
राजेश शेळके

रत्नागिरी :  जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊनच्यादृष्टीने सुधारीत आदेश  जारी केले आहेत. त्यामध्ये लॉकडाऊनमधून आणखी काही शिथिलता दिली आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती, गॅरेज, चार्टर्ड अकाऊटंट, पासपोर्ट कार्यालय, रस्त्यालगतचे धाबे, वृत्तपत्रे, चष्म्याची दुकाने नियम पाळून सुरू ठेवण्यात येणार आहेत. तसे आदेश अप्पर जिल्हाधिकारी सजंय शिंदे यांनी आज जारी केले आहेत.  

जिल्ह्यात शासनाच्या आदेशावरून गेल्या सोमवारपासून लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यानंतर शनिवार, रविवार कडक संचारबंदी लागू केली आहे. या दरम्यान जिल्हा प्रशासाने आणखी काही शिथिलता दिली आहे. या फेरआदेशामध्ये म्हटले आहे की, कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत भाजीपाला, फळे, धान्य, कडधान्य, तृणधान्य इत्यादी जीवनावश्यक वस्तूंची खरेदी-विक्री होत असल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती सुरू ठेवण्यात येणार आहे. अत्यावश्यक सेवेमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा समावेश केलेला असल्यामुळे वाहनांची दुरुस्ती ही आवश्यक आहे. म्हणून गॅरेज सुरू ठेवण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. 

बँक व्यवहार आणि इतर आर्थिक सेवेशी संबंधित असलेली कार्यालये सुरू ठेवण्याची परवानगी आहे. त्या अनुषंगाने चार्टर्ड अकाऊटंट यांची कार्यालये सुरू ठेवण्यात येणार आहेत. आपले सरकार सेवाकेंद्र, सेतू, सिटिझन सर्व्हिस सेंटर, सेतू केंद्र तसेच पासपोर्ट सेवा केंद्र सुरू ठेवली जाणार आहेत. या आस्थापना एक खिडकीचा वापर करून सुरू ठेवण्याची मुभा राहील.
 हॉटेल, बार आणि रेस्टॉरंट यांना सुरू ठेवण्यास दिलेल्या परवानगीनुसार रस्त्याच्या कडेवरील धाबे सुरू ठेवता येतील; मात्र कोणत्याही ग्राहकास धाब्यावर बसून सेवा न पुरविता केवळ  पार्सल सेवा घेऊन जाण्यास किंवा खाद्यपदार्थ घरपोच पोहचविण्यास परवानगी आहे. 

डोळ्यांच्या रुग्णांसाठी चष्मा ही अत्यावश्क बाब असल्याने अशा रुग्णांसाठी चष्म्याची दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी आहे. या आदेशान्वये घालण्यात आलेल्या वेळेचे बंधन व इतर अटी शर्ती लागू राहतील. मुभा देण्यात आलेल्या आस्थापनांना त्यांच्या कार्यरत कर्मचार्‍यांना लसीकरण केलेले असणे आवश्यक आहे किंवा 15 दिवसापर्यंत वैध असणारे चाचणीचे प्रमाणपत्र जवळ बाळगणे आवश्यक राहील. उपरोक्त आदेशाचे पालन न करणार्‍या कोणत्याही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय साथरोग अधिनियम 1897 आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील तरतुदीप्रमाणे कारवाई करण्यात येईल, याची नोंद घेण्यात यावी. आदेश संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याच्या क्षेत्रासाठी (प्रतिबंधित क्षेत्र वगळून) 30 एप्रिल 2021 चे रात्री 11.59 वाजेपर्यंत लागू राहील.


वृत्तपत्रे सुरूच राहणार

वृत्तपत्र सेवा सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. त्यामध्ये मॅगझिन (मासिके)-जनरल्स आणि पिरिऑडिकल्स (साप्ताहिक, पाक्षिक, नियतकालिके) यांचा समावेश करण्यात येत आहे. वृत्तपत्र विक्रेत्यांनाही (स्टॉल धारक) पोलिसांनी सहकार्य करावे.

संपादन- अर्चना बनगे