महाआघाडी सरकारवर रत्नागिरी भाजपने केले 'हे' आरोप

सकाळ वृत्तसेवा
Monday, 24 February 2020

लालसेपोटी शिवसेनेने युती तोडून विश्वासघात केला. जलयुक्त शिवार ही शेतकऱ्यांना वरदान ठरलेली योजना केवळ देवेंद्र फडणवीस यांना श्रेय मिळते म्हणून बंद करत आहेत.

रत्नागिरी - महाआघाडी शासन येऊन 3 महिने होऊन गेले मात्र अद्यापही शासन सक्रीय आहे, असे जाणवत नाही. पूर्वीच्या लोकाभिमुख सरकारच्या कामांना स्थगिती देणे आणि दोन पक्षांना खोळंबत राहणे एवढेच काम होताना दिसते. आघाडीच्या निष्क्रिय कारभाराविरुद्ध जाब विचारण्यासाठी उद्या भाजप पूर्ण ताकदीनिशी धरणे आंदोलन करणार असल्याचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष ऍड. दीपक पटवर्धन यांनी सांगितले. 

लालसेपोटी शिवसेनेने युती तोडून विश्वासघात केला. जलयुक्त शिवार ही शेतकऱ्यांना वरदान ठरलेली योजना केवळ देवेंद्र फडणवीस यांना श्रेय मिळते म्हणून बंद करत आहेत. भा.ज.पा. प्रखर विरोधी पक्षाची भूमिका प्रामाणिकपणे बजावेल जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी विकास कामे योग्य पद्धतीने व्हावीत यासाठी आक्रमक जागरूक धोरण अवलंबेल. जनतेमध्ये जाऊन शासनाच्या नाकर्तेपणाचा पर्दापाश करेल. याचा प्रत्यय धरणे आंदोलनातून येईल, असे ऍड. पटवर्धन यांनी स्पष्ट केले. 

उद्या सकाळी 11 ते 2 या दरम्यान दक्षिण रत्नागिरी जिल्ह्यात लांजा, राजापूर, संगमेश्‍वर, रत्नागिरी येथे भाजपचे धरणे आंदोलन केले जाईल. त्या त्या तालुक्‍यातील तहसीलदार कार्यालयाबाहेर आणि रत्नागिरीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन होईल. भाजपचे नेते, पदाधिकारी बूथप्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख, नगरसेवक, शेतकरी बंधू, महिला तसेच जनसामान्य नागरिक या धरणे आंदोलनात सहभागी होतील आणि अकार्यक्षम राज्य शासनाला असलेला आपला विरोध शांततामय धरणे आंदोलनातून व्यक्त करतील, असे ऍड. पटवर्धन म्हणाले. 

चिपळुणात भाजपचे आज धरणे आंदोलन 

चिपळूण - भाजपतर्फे मंगळवारी (ता. 25) चिपळूण येथील तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती तालुकाध्यक्ष विनोद भोबस्कर व शहराध्यक्ष अशिष खातू यांनी दिली. 

शिवसेना - कॉंग्रेस - राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली असून आघाडी सरकारच्या बेफिकिरीमुळे राज्यात महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. याचा निषेध करण्यासाठी भाजपतर्फे मोर्चाचे आयोजन केले आहे. भोबस्कर म्हणाले, भाजपचा विश्वासघात करून कॉंग्रेस- राष्ट्रवादीबरोबर सत्ता स्थापन केलेल्या शिवसेनेने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे.

सरकार स्थापन करीत असताना शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी आणि आत्ताच्या मुख्यमंत्र्यांनी तसेच कॉंग्रेस- राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अवकाळीग्रस्तांना 25 हजार रुपये हेक्‍टरी आणि फळबागांसाठी 50 हजार रुपये हेक्‍टरी मदत देण्याची घोषणा केली होती. पण महाविकास आघाडी सरकारच्या प्रमुखांना आश्वासनांचा विसर पडला आहे. त्याविरोधात हा मोर्चा काढला आहे.  

 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ratnagiri BJP Agitation Against Maha Vikas Aghadi Government