निवेदनांना केराची टोपली मिळाल्याने भाजपचा आता `हा` पवित्रा

सकाळ वृत्तसेवा
Friday, 7 August 2020

तेव्हापासून रत्नागिरीत तपासणी प्रयोगशाळा उभारा अशी मागणी केली. चाकरमान्यांना रत्नागिरीत आणण्यापूर्वी आरोग्य यंत्रणा सक्षम करा, अशी निवेदने दिली.

रत्नागिरी - कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि व्हेंटिलेटरवर असणारी जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा काही उपयोगाची नाही. गेले चार महिने सनदशीर मार्गाने अर्ज, विनंत्या करून, निवेदने दिली. मात्र या सर्व निवेदनांना देऊन पालकमंत्री, आरोग्य मंत्री, जिल्हाधिकारी आणि यंत्रणेने केराची टोपली दाखवली. आता सर्व जनतेला बरोबर घेऊन रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ आली आहे, असा इशारा भाजपचे जिल्हाध्यक्ष ऍड. दीपक पटवर्धन यांनी दिला. 

तीव्र आंदोलनाची ही वेळ नाही, याचे भान आहे. परंतु रत्नागिरीकरांनी दोन डॉक्‍टरांसह आणखी मान्यवर व्यक्ती कोरोनामुळे गमावल्या. फक्त उपचार झाले नाही म्हणूनच त्यांचे निधन झाले. याची जाणीव ठेवूनच समाजातील मान्यवर घटकांना बरोबर घेऊन हे आंदोलन करणार असल्याचे ऍड. पटवर्धन यांनी स्पष्ट केले. कोरोनामुळे मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाला. रत्नागिरी जिल्ह्यातही रुग्ण सापडू लागले.

तेव्हापासून रत्नागिरीत तपासणी प्रयोगशाळा उभारा अशी मागणी केली. चाकरमान्यांना रत्नागिरीत आणण्यापूर्वी आरोग्य यंत्रणा सक्षम करा, अशी निवेदने दिली. रुग्णालयातील अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे व पुरेशा डॉक्‍टरांअभावी आरोग्य यंत्रणाच व्हेंटीलेटरवर आहे. या सर्व निवेदनांना राज्य शासनाने केराची टोपली दाखवली. काहीही सुधारणा केल्या नाहीत. मुंबईकर मोठ्या संख्येने रत्नागिरीत दाखल झाले. त्यानंतर रुग्णांची संख्या वाढू लागली. यंत्रणा सुधारणेवर भर दिला गेला नाही, असा आरोप ऍड. पटवर्धन यांनी केला. 

पालकमंत्र्यांकडून जिल्हा वाऱ्यावर 

मंत्री परब यांना जिल्ह्याचे पालक का म्हणावे? आतापर्यंत त्यांनी फक्त एक - दोन वेळाच मंत्री जिल्ह्याचा आढावा घ्यायला आले. शासकीय रुग्णालयावरचा ताण कमी करण्यात स्थानिक लोकप्रतिनिधींना यश आलेले नाही. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे आरोग्य यंत्रणा अडचणीत आहे. डॉक्‍टरांच्या आयएमए संघटनेनेही आरोग्य यंत्रणा धोक्‍यात आहे, असे पत्र दिले आहे. आता याविरोधात जागरूक नागरिकांसमवेत रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागणार आहे, असे पटवर्धन यांनी ठामपणे सांगितले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ratnagiri BJP Agitation Hint Ad Deepak Patvardans Comment