Ratnagiri Dam Mishap : धरण माथा गाठला, त्यांचा जीव वाचला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 जुलै 2019

उशाला असलेले धरण फुटल्याची माहिती मंगळवारी (ता.२) रात्री मिळताच तिवरे धरणाच्या पायथ्याशी असलेल्या भेंदवाडीतील ग्रामस्थांचा थरकाप उडाला. काही जण झोपेतच पाण्याच्या लोंढ्यात वाहून गेले. जे जंगलातून धरणाच्या माथ्याकडे पळून गेले ते बचावले.

उशाला असलेले धरण फुटल्याची माहिती मंगळवारी (ता.२) रात्री मिळताच तिवरे धरणाच्या पायथ्याशी असलेल्या भेंदवाडीतील ग्रामस्थांचा थरकाप उडाला. काही जण झोपेतच पाण्याच्या लोंढ्यात वाहून गेले. जे जंगलातून धरणाच्या माथ्याकडे पळून गेले ते बचावले. घरातील चीजवस्तू गोळा करण्याच्या नादात थांबले, त्यांना जलसमाधी मिळाली. तिवरे धरणाची भिंत ज्यांनी गाठली ते २६ जण वाचले. रात्रभर आपल्या गावकऱ्यांचे काय झाले असेल, या थरकाप उडवणाऱ्या विचारातच त्यांनी रात्र जागून काढली. या साऱ्यांना बुधवारी तिवरे हायस्कूलमध्ये तात्पुरता निवारा देण्यात आला.  
तिवरे गावची एकूण लोकसंख्या एक हजार ४८६ आहे. गावात भेंदवाडीसह गावठाण, फणसवाडी, गंगेचीवाडी, हेलणवाडी, बौद्धवाडी, रोहिदासवाडी, राजवाडा, कुंभारवाडी आदी वाड्या आहेत. तिवरे धरणाच्या पायथ्याशी असलेल्या भेंदवाडीस सर्वाधिक फटका बसला. वाडीत ८१ कुटुंबे असून ४६ घरे आहेत. रात्री नऊच्या सुमारास धरण फुटल्याची माहिती मिळाली. त्या वेळी जे झोपले होते, ते पुराच्या पाण्यात क्षणार्धात वाहून गेले. जागे असलेल्या ग्रामस्थांनी धावतच डोंगराचा भाग चढून धरणाच्या उजव्या टोकाची भिंत गाठली. तिथेच माजी उपसरपंच तानाजी चव्हाण यांच्या शेडमध्ये रात्रभर थांबले.

दरम्यान, काल रात्री ११ च्या दरम्यान नायब तहसीलदार तानाजी शेजाळ सर्वप्रथम पोचले. तसेच येथील मूळचे रहिवासी मंगेश शिंदे व त्यांच्या पत्नी मेघना शिंदे शेडपर्यंत पोचल्या. तेथील धरणग्रस्तांना त्यांनी धीर दिला. रात्र आणि पाण्याचा वेग असल्याने शोधकार्य शक्‍य नव्हते. एक किलोमीटरवर गाड्या थांबवून सर्व यंत्रणा घटनास्थळी  पोचली. 

दरम्यान, आज पहाटे घटनास्थळी पोचल्यानंतर वाचलेल्या २६ लोकांना एकाच ठिकाणी वास्तव्य करता यावे, यासाठी प्रशासनाने तिवरे हायस्कूलमध्ये त्यांची व्यवस्था केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ratnagiri Dam Mishap bhendwadi villagers Saved their lives