भाजपच्या नव्या प्रदेश कार्यकारणीत रत्नागिरीची पाटी कोरीच...

मुझफ्फर खान
शनिवार, 4 जुलै 2020

बाळ माने यांच्याकडे सध्या कोणतेच पद नाही त्यामुळे नव्याने जाहीर होणार्‍या कार्यकारणीमध्ये मानेंना स्थान मिळेल अशी शक्यता होती.

चिपळूण - भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच राज्याची कार्यकारणी जाहीर केली. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नेत्यांना स्थान मिळाले आहे. रत्नागिरी जिल्ह्याची पाटी मात्र कोरीच राहिली. त्यामुळे जिल्ह्यातील भाजपला वाली कोण ? असा प्रश्‍न उपस्थित केले जात आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात भाजपची ताकद कमी असली तरी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना तत्कालीन जिल्हाध्यक्ष बाळ माने, विद्यमान जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू, डॉ. पटवर्धन आदींनी पक्ष तळागाळापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला होता. राज्यमंत्री रविंद्र चव्हाण, आमदार प्रसाड लाड यांनी जिल्ह्याकडे विशेष लक्ष दिल्यामुळे भाजपचे कमळ हे चिन्ह ग्रामीण भागापर्यंत पोहचले होते. चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली गुहागरचे माजी आमदार डॉ. विनय नातू यांना कोकण पातळीवर काम करण्याची संधी मिळाली होती. त्यानंतर पक्षात काही फेरबदल झाले. बाळ माने यांचे जिल्हाध्यक्षपद डॉ. दिपक पटवर्धन यांना देण्यात आले. त्यांच्याकडे संगमेश्‍वर, देवरूख, लांजा, रत्नागिरी आणि राजापूरची जबाबदारी देण्यात आली. डॉ. नातू यांना उत्तर रत्नागिरीचे जिल्हाध्यक्षपद देवून मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण आणि गुहागरची जबाबदारी देण्यात आली.

वाचा - हे तर मराठा समाजाच्या बदनामीचे षड्‌यंत्र...!

बाळ माने यांच्याकडे सध्या कोणतेच पद नाही त्यामुळे नव्याने जाहीर होणार्‍या कार्यकारणीमध्ये मानेंना स्थान मिळेल अशी शक्यता होती. मात्र त्यांचाही समावेश झालेला नाही त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल सुरू आहे. प्रदेश कार्यकारणी सदस्यांच्या यादीत रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणी नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राणे प्रमोद जठार यांना कोषाध्यक्ष म्हणून संधी मिळाली आहे. राणे  पिता-पुत्रांचा प्रदेश कार्यकारणीमध्ये समावेश आहे. खासदार नारायण राणे हे विशेष निमंत्रित सदस्य तर माजी खासदार निलेश राणे निमंत्रित सदस्य म्हणून कार्यकारणीमध्ये आहेत. निलेश राणेंच्या जोडीला अतुळ काळसेकर यांनाही निमंत्रित सदस्य म्हणून संधी मिळाली आहे.
 

35 वर्ष मी भाजपशी प्रामाणिक आहे. प्रदेशाध्यक्ष आणि सरचिटणीस पद वगळता सर्वच पदे मला मिळाली आहेत. त्यामुळे प्रत्येकवेळी मलाच पदे हवीत. हा माझा स्वभाव नाही. पक्षात नव्याने आलेल्या लोकांचाही विचार व्हायला पाहिजे. पद नसले तरी कोकणात पक्षवाढीसाठी काम करत राहणार. नवी पिढीला मार्गदर्शन करत पक्षवाढीसाठी प्रयत्न करत राहणार आहे. त्यामुळे प्रदेश कार्यकारणीमध्ये न घेतल्याचा दुखः अजिबात नाही. - बाळ माने, माजी जिल्हाध्यक्ष भाजप रत्नागिरी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ratnagiri district leader has no place in BJP's new state executive