रत्नागिरीत मास्क न वापरणाऱ्यांकडून 20 हजारांचा दंड वसूल 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 7 October 2020

राज्यात कोरोना आजाराचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर, मास्क वापरण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. त्यानुसार रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी, बाजारपेठेत, नागरिक सोशल डिस्टन्सिंग अथवा मास्कचा वापर करीत नसल्याचे दिसत आहे.

रत्नागिरी - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्कचा वापर अनिवार्य आहे; मात्र शहरासह ग्रामीण भागात जनजागृती करूनही मास्कचा वापर न करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. शहरासह ग्रामीण भागातील 92 नागरिकांवर केलेल्या कारवाईतून 20 हजार 400 रुपयांचा दंड वसूल केला आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईने नागरिकांची तारांबळ उडाली. नागरिकांनी मास्कचा वापर न केल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी दिला आहे. 

राज्यात कोरोना आजाराचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर, मास्क वापरण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. त्यानुसार रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी, बाजारपेठेत, नागरिक सोशल डिस्टन्सिंग अथवा मास्कचा वापर करीत नसल्याचे दिसत आहे. पोलिस अधीक्षक डॉ. गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्‍यामध्ये तसेच सर्व पोलिस ठाणेमार्फत ग्रामीण भागात मास्क वापरणे, ठराविक अंतर ठेवणे, सॅनिटायझरचा वापर करणे याबाबत जनजागृती केली होती. जे नागरिक मास्क न वापरता आढळून आलेत त्यांना मास्कचे वाटप करण्यात आले होते. 

नागरिकांनी मास्क वापरावेत यासाठी पोलिस दलातर्फे जनजागृती करूनही नागरिक सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करीत नसल्याचे दिसत होते. या पार्श्‍वभूमीवर मंगळवारी (ता. 6) शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिल लाड व पथक यांनी शहर हद्दीतील बाजारपेठेत पोलिस कर्मचारी व पालिका कार्यालय तसेच येथील मालमत्ता विभाग यांच्या संयुक्त पथकाने एकूण 15 केसेसमध्ये 7 हजार 500 रुपयांचा दंड वसूल केला. 

रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाणे पोलिस निरीक्षक सुरेश कदम यांच्या पथकाने ग्रामीण हद्दीतील पाली दूरक्षेत्र, जाकादेवी, कोतवडे, चांदेराई, खेडशी येथे पोलिस कर्मचारी व ग्रामसेवक, पोलिस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष यांच्या मदतीने एकूण 77 केसेस करून 12 हजार 900 रुपयांचा दंड वसूल केला. नागरिकांनी कोविड-19 च्या अनुषंगाने शासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग पाळावे व मास्कचा वापर करावा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 
- डॉ. मोहितकुमार गर्ग, जिल्हा पोलिस अधीक्षक  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Ratnagiri Fine Of Rs 20000 Collected Those Who Did Not Wear Masks