गणपतीपुळेला पर्यटकांची पसंती ‘विकेण्ड’ला | Ratnagiri | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गणपतीपुळे

रत्नागिरी : गणपतीपुळेला पर्यटकांची पसंती ‘विकेण्ड’ला

रत्नागिरी : दिवाळीच्या सुट्टीत सुरु झालेला पर्यटकांचा ओघ अजुनही सुरुच असून विकेण्डसाठी गणपतीपुळेला पहिली पसंती मिळत आहे. गेले दोन दिवस किनाऱ्‍यावर प्रचंड गर्दी आहे. यामध्ये सर्वाधिक पश्‍चिम महाराष्ट्रातील पर्यटक आहेत. हा वर्ग एक दिवसाचाच असल्याने त्याचा निवासाला फायदा होत नाही. तर कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती खालावल्यामुळे खर्चावरही नियंत्रण आल्याने वॉटर स्पोर्टस्सह मनोरंजनासाठीच्या साधनांकडील वर्ग घटत आहे.

हेही वाचा: रत्नागिरी : भातपिकाच्या गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा अधिक

दिवाळीच्या सुट्टीमध्ये फिरण्यासाठी पर्यटकांचा सर्वाधिक ओढा समुद्रकिनाऱ्‍यांकडे होता. त्यामुळे दापोली, हर्णे, कर्देसह गणपतीपुळे किनारी पर्यटकांची गर्दी होती. तो ओघ गेल्या आठवड्यात कमी-अधिक प्रमाणात होता. पण आठवड्याच्या अखेरीस शनिवार, रविवारी सुट्टी असल्यामुळे पर्यटकांनी गणपतीपुळे गाठले होते. गेल्या दोन दिवसात अनुक्रमे दहा हजार आणि आठ हजार पर्यटकांनी गणपतीपुळे मंदिरात दर्शन घेतले.

पर्यटक दर्शन घेतल्यानंतर किनाऱ्यावर फिरून माघारी परतत होते. त्यामुळे किनारे फुल्ल असले तरीही मनोरंजनाच्या साधनांना तीस टक्केच प्रतिसाद मिळाल्याचे व्यावसायिकांकडून सांगण्यात आले. कोरोनामुळे अनेक पर्यटक खर्चही जपून करत आहेत. त्यामुळे सागरी क्रीडा प्रकारांमध्ये बोटींग, जेट स्कीच्या गाड्या रविवारी दुपारी किनाऱ्यावर उभ्या होत्या. अधुनमधून एखाद्या बोटीला पर्यटकांचा प्रतिसाद मिळाला. घोडे, उंट यासह गाडी स्वारांना ग्राहकांचा प्रतिसाद कमी मिळाला. गणपतीपुळेत अजुनही अलोट गर्दीची स्थिती नाही. एखाद्या रात्री निवास व्यवस्था फुल्ल होते. सध्या तीस ते चाळीस टक्के पर्यटक निवासाला प्राधान्य देत आहे. त्यामुळे हॉटेल, छोटे फेरीवाले यांना समाधानकारक ग्राहक आहे. सध्या येत असलेल्यांमध्ये कोल्हापूर, सांगलीतील पर्यटकांची संख्या अधिक आहे.

हेही वाचा: हडपसर : दिवाळी फराळाच्या निमित्ताने इच्छुकांची मोर्चेबांधणी

पावसामुळे उडाली तारांबळ

रविवारी (ता. १४) सायंकाळी अचानक रत्नागिरीत मुसळधार पावसाला सुरवात झाली. फिरायला आलेल्यांची तारांबळ उडाली होती. किनाऱ्यावर फिरणारे पावसापासून सुरक्षित राहण्यासाठी दुकाने, टपऱ्यासंह मंदिराकडे वळले होते. त्यामुळे पर्यटकांच्या उत्साहावर पाणी फेरले गेले.

"पर्यटक किनाऱ्यावर येत आहेत; परंतु मनोरंजनाच्या साधनांवर जपून खर्च करत आहेत. त्यामुळे जल क्रीडांसारख्या मनोरंजनांचा आनंद घेणारा पर्यटक घटला आहे."

- उदय पाटील, बोटींग व्यवसायिक

loading image
go to top