esakal | Ratnagiri: सिलिंडरच्या तुटवड्याने जनता गॅसवर
sakal

बोलून बातमी शोधा

सिलिंडरच्या तुटवड्याने जनता गॅसवर

रत्नागिरी : सिलिंडरच्या तुटवड्याने जनता गॅसवर

sakal_logo
By
राजेश शेळके

रत्नागिरी : लांब पल्ल्याच्या अणुस्कुरा घाटातून होणाऱ्या सिलिंडर वाहतुकीचा वितरणावर मोठा परिणाम झाला आहे. ट्रान्स्पोर्टच्या गाड्या वेळेवर येत नसल्याने वितरण व्यवस्था कोलमडली आहे. शहरामध्ये मोठ्या प्रमाणात सिलिंडरचा तुटवडा भासत असल्याने अनेक ग्राहक वेटिंग लिस्टवर आहेत. या काळात ऑनलाइन बुकिंग कुचकामी ठरत असून ग्राहकांना एजन्सीपर्यंत रिकामा सिलिंडर घेऊन जावे लागत आहे. नंबर लावूनही तीन -तीन दिवस सिलिंडर येत नाही. ग्राहकांची प्रचंड गैरसोय होत असून यामुळे एजन्सीमध्ये गर्दी होत आहे.

हेही वाचा: Mumbai Drug Case: खरा रिपोर्ट समोर येऊ द्या! अभिनेता सुनील शेट्टीचं व्टिट

जिल्ह्यात २२ जुलैला झालेल्या अतिवृष्टीमुळे आंबा घाटात अनेक ठिकाणी दरड कोसळली. तसेच दोन ते तीन ठिकाणी रस्ता खचल्याने अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे. परिणामी रत्नागिरी येणाऱी अवजड वाहतूक अणुस्कुरा घाटातून सुरू आहे. दुसरा मार्ग कऱ्हाड-चिपळूणहून रत्नागिरीला येण्याचा आहे. मात्र, यामध्ये वाहतुकीचे अंतर वाढल्याने ट्रान्स्पोर्टधारकांनी भाड्यात वाढ केली आहे. त्याचा सर्व वस्तूंवर परिणाम झाला असून व्यावसायिक, व्यापाऱ्यांनी वस्तूंमध्ये दरवाढ केली आहे; मात्र या वाहतुकीचा आता थेट गॅस सिलिंडर वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

दरम्यान, एजन्सीधारक म्हणाले, गॅस कंपन्यांकडून सिलिंडर भरून येणाऱ्या गाड्या वेळेवर येत नाहीत. आंबा घाटातून वाहतूक सुरू होती, तेव्हा सकाळी लवकर गाड्या येत होत्या. त्यामुळे योग्य पद्धतीने वितरण होत होते. अणुस्कुरा घाटातून येणाऱ्या गाड्यांना सुमारे सहा ते सात तास लागतात. गाड्यांना यायला आठ ते दहा वाजत असल्याने ज्यांनी नंबर लावला आहे, त्यांना वेळेवर सिलिंडर देणे शक्य होत नाही. ऑनलाइन बुकिंग झाले असले तरी वेळेत डिलिव्हरी करता येत नाही. ग्राहकांना एजन्सीपर्यंत यावे लागते. तेही सिलिंडर असेल तर मिळतो. अन्यथा, दुसऱ्या दिवसाची वाट पाहावी लागते.

एजन्सीवर प्रचंड गर्दी आणि रांग

गॅस कंपनीच्या गाड्या यापूर्वी सकाळी सहा वाजेपर्यंत रत्नागिरीतील एजन्सींपर्यंत येत होत्या. त्यानंतर सकाळी सिलिंडर वितरण सुरू होते. ऑनलाइन बुकिंसाठी एजन्सीकडून वेगळ्या गाड्या पाठवल्या जातात. ज्यांना तत्काळ सिलिंडर हवा असेल ते थेट रिकामे सिलिंडर घेऊन एजन्सीकडून दुसरा भरलेला सिलिंडर घेऊन जातात; मात्र गेल्या काही दिवसांपासून ऑनलाइन बुकिंगचे तीनतेरा वाजले आहेत. अनेकांनी पंधरा दिवस ते महिना झाले तरी ऑनलाइन नंबर लावूनही सिलिंडर मिळालेला नाही; मात्र एजन्सीवर प्रचंड गर्दी आणि रांग दिसत आहे.

हेही वाचा: कॉर्डेलिया क्रूझचा आणि त्या घटनेचा संबंध नाही : जर्गेन बेलोम

एक नजर...

शहरामध्ये शांतादुर्गा, विजय गॅस एजन्सी, रत्नागिरी गॅस एजन्सी

प्रत्येकाकडे साधारण ५ ते ७ हजार ग्राहक

सिलिंडरच्या गाड्या येण्यास ६ ते ७ तास

वेटिंग लिस्ट वाढल्याने ग्राहकांची गैरसोय

अणुस्कुरा घाटातून सिलिंडरची वाहतूक होत असल्याने वेळेवर गाड्या येत नाहीत. त्याचा परिणाम वितरणावर होत असून ग्राहकांना एक-दोन दिवस उशिरा सिलिंडर मिळत आहे. वेळेवर गाड्या आल्या की, त्यामध्ये बदल होईल.

- भीमसेन रेगे, शांतादुर्गा गॅस एजन्सी

loading image
go to top