आंजर्ले, वेळास जैवविविधता वारसास्थळ

शिरीष दामले
सोमवार, 5 जून 2017

रत्नागिरी - जिल्ह्यातील आंजर्ले आणि वेळास या दोन गावांना जैवविविधता वारसा स्थळांचा दर्जा मिळाला आहे. हा वारसा टिकवण्याची आणि वाढविण्याची जबाबदारी प्रामुख्याने आता या गावांवरच आहे. यातून पर्यटनात वाढ आणि त्याअनुषंगाने रोजगारनिर्मिती व त्याचा गावाला फायदा होईल. 

रत्नागिरी - जिल्ह्यातील आंजर्ले आणि वेळास या दोन गावांना जैवविविधता वारसा स्थळांचा दर्जा मिळाला आहे. हा वारसा टिकवण्याची आणि वाढविण्याची जबाबदारी प्रामुख्याने आता या गावांवरच आहे. यातून पर्यटनात वाढ आणि त्याअनुषंगाने रोजगारनिर्मिती व त्याचा गावाला फायदा होईल. 

ही नवी ओळख मिळण्यासाठी गावाने व सह्याद्री निसर्गमित्र या संस्थेने केलेले प्रयत्न जिल्ह्यातील अनेक गावांसाठी अनुकरणीय आहेत. परिसराची संपत्ती कोणाला ओरबाडू द्यायची नाही, हे सर्वस्वी गावावर अवलंबून राहणार आहे. जिल्ह्यात आणखी काही गावांना अशी ओळख मिळवण्याची संधी आहे. वेळासची ओळख कासवांचे गाव म्हणून देश-परदेशात झाली आहे. किनारपट्टीला कासव संवर्धनाची जाणीव वाढत आहे. त्यामुळे आंबोळगड नाट्यापासून गुहागर तालुक्‍यातील तवसाळपर्यंत कासव संवर्धन सुरू आहे. सह्याद्रीने २००२ पासून सागरी कासव संरक्षण मोहीम वेळासला सुरू केली. हळूहळू लोकांना त्याचे महत्त्व पटले. त्यानंतर २००६ ला पहिला कासव महोत्सव भरवला. तेव्हापासून तो सतत सुरू आहे. याकामी वन विभागानेही सहकार्य केले आहे. त्यांचेही प्रयत्न आहेत. 

स्थानिकांना प्रशिक्षण देण्यात आले. २०१३ ला सह्याद्रीने ग्रामस्थांकडे एक प्रकारे हा प्रकल्प सुपूर्द केला. ग्रामस्थांनाही त्याचे महत्त्व पटले. यातून वेगळी ओळख निर्माण झाली. अशी माहिती संस्थेचे भाऊ काटदरे यांनी दिली.

जैवविविध वारसा स्थळ जाहीर झाल्यामुळे गावच्या परवानगीविना तेथे व्यापार किंवा इतर आर्थिक लाभाच्या व त्यासाठी गावाची जैवविविधतेचा वापर शक्‍य होणार नाही. पर्यटन वाढीला त्याचा फायदा मिळेल. एका अर्थाने या सगळ्यावर आता गावाचे नियंत्रण असेल. नैसर्गिक वनस्पती, प्राणी, कीटक आदी विविधतेवरही एक प्रकारचे नियंत्रण राहणार आहे. त्याचे मार्केटिंग करून जैवविविधता टिकवणे हे गावापुढील आव्हान आहे.

लूटमारीला पायबंद...
जैवविविधता वारसा स्थळे ओळख मिळाल्यामुळे या परिसरातील निसर्गाचे संवंर्धन होण्यास मदत होईल. दुर्मिळ खडक, कीटक, पक्षी आणि अंडी यानी संपन्न असलेल्या या प्रदेशातून पूर्वी लोक लूटमार करत असत; परंतु आता त्याला पायबंद घालता येईल.

खेकड्याची वेगळी प्रजाती
जैवविविधता टिकवण्यासाठी ग्रामसभांमध्ये प्रयत्न करण्यात आले. वेळासला खेकड्यांची वेगळी प्रजाती सापडली. महाराष्ट्रात ती फक्त वेळासलाच आहे. या परिसरात पांढऱ्या पोटाचे समुद्र गरुड आहेत. त्यांची निवासस्थाने आहेत. ती जतन करण्याचे महत्त्व पटले. याबाबतचा आंजर्लेचा अभ्यास सुरू आहे. आता या जैवविविधतेला विकासाच्या नावाखाली हानी पोचणार नाही वा ती नष्ट होऊ देणार नाही असा पण गावकऱ्यांनी केल्यामुळे हा दर्जा मिळाला आहे. अशी माहिती वेळासचे मोहन उपाध्ये यांनी दिली.

Web Title: ratnagiri konkan aanjarle velas Biodiversity heritage