प्रवाशांच्या ट्‌विटमुळे रेल्वेतील मद्यपींना दणका

राजेश कळंबटे
मंगळवार, 5 सप्टेंबर 2017

दोघांना दंडासह पाच दिवसांची साधी कैद

दोघांना दंडासह पाच दिवसांची साधी कैद
रत्नागिरी - प्रवाशांच्या समस्या ट्‌विटरवर कळविल्यानंतर त्याची गंभीर दखल घेतली जाते, याचा प्रत्यय नुकताच कोकण रेल्वे प्रवाशांना आला. दोन वेगवेगळ्या रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी दारू पिऊन धिंगाणा केला. त्याबद्दल प्रवाशांनी ट्‌विट केले. त्याची तत्काळ दखल घेत रेल्वे सुरक्षा दलाच्या पोलिसांनी दोघांवर कारवाई केली. त्यांना सोमवारी न्यायालयात हजर केले असता पाचशे रुपये दंडासह पाच दिवस साध्या कारावासाची कैद सुनावली. ही माहिती रेल्वे सुरक्षा दलाचे पोलिस निरीक्षक अजित मधाळे यांनी आज येथे दिली.

रेल्वेतील प्रवासामध्ये अनेक अनुचित प्रकार घडतात. त्याला आळा घालण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने सोशल मीडियावरील सूचनांचीही गंभीर दखल घेण्याचा आदेश दिला आहे. कोचिवली-डेहराडून या गाडीतून रमेश प्रसाद ब्रिजमोहन (28, रा. नरेंद्रनगर, उत्तराखंड) 2 सप्टेंबरला डेहराडूनवरून प्रवास करीत होता. प्रवाशांना तो उपद्रव देत होता. ही माहिती एका प्रवाशाने ट्‌विट केली. तसाच दुसरा प्रकार धम्मरत्न अशोक गोवंदे (33, सांगवी, नांदेड) याने करमाळी-पुणे रेल्वेतील प्रवासात केला. धम्मरत्न या रेल्वे गाडीत कोच अटेंडंट म्हणून कंत्राटी कामगार होता. त्याच्या त्रासाला कंटाळून प्रवाशांनी तक्रारी दिल्या. ट्‌विटरवरील तक्रारींसाठी विशेष कक्ष असल्याने त्याची माहिती त्वरित रत्नागिरीतील रेल्वे सुरक्षा दलाला देण्यात आली.

पोलिसांनी त्या दोघांनाही ताब्यात घेतले. त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयानेही गंभीर दखल घेऊन त्या दोघांना पाच दिवस साधी कैद आणि पाचशे रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास दहा दिवस साध्या कैदेत ठेवण्याचा आदेश दिला.

Web Title: ratnagiri konkan alcoholic passenger in railway