राष्ट्रीय महामार्गावर ५६ ब्लॅक स्पॉट

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 जुलै 2017

वाहतूक शाखेकडून निश्‍चिती - उपाययोजनांचा अहवाल वरिष्ठांकडे  

रत्नागिरी - मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर ५६ ब्लॅक स्पॉट निश्‍चित करण्यात आले आहेत. या ठिकाणी किमान पाच ते दहा जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे, असे हे स्पॉट आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वाहतूक शाखेने केलेल्या सर्व्हेमध्ये ही बाब पुढे आली आहे. त्यावर उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने प्रयत्न सुरू झाले आहेत. महामार्ग विभागाच्या मुख्य कार्यालयाला याचा अहवाल सादर करण्यात येणार आहे.

मुंबई-गोवा हा राष्ट्रीय महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. खेड तालुक्‍यातील कशेडी घाट ते सिंधुदुर्ग दरम्यानच्या सुमारे ४०० किलोमीटरच्या मार्गावरील सुमारे २०० किलोमीटर मार्गात अवघड वळणे आहेत. परजिल्ह्यातील चालकांना हा महामार्ग नवखा आणि अवघड वळणाचा वाटतो. शिवाय ७५ टक्के वाहनचालक या मार्गावरील नियम धाब्यावर बसवून वाहने हाकतात. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत असल्याचे मत रत्नागिरीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यापूर्वीच व्यक्त केले आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक गेल्या काही वर्षांमध्ये चौपट वाढली आहे. या मार्गावरून दररोज दीड ते दोन हजारांपेक्षा अधिक वाहने ये-जा करतात. त्यात ३५ ते ४० टक्के अवजड वाहनांचा समावेश आहे. इतर जिल्ह्यांत सरळ रस्ते असल्याने वाहने वेगाने चालविण्यात अडचणी येत नाहीत. कोकणात तशी स्थिती नाही.

अवघड घाट आणि नागमोडी वळणांच्या रस्त्यांमुळे वाहने सावधगिरीने चालवावी लागतात. हे लक्षात न घेता नवखे वाहनधारकही वेगमर्यादा सोडून वाहने हाकतात. त्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळते. वाढते अपघात रोखण्यासाठी पोलिस, वाहतूक विभाग, आर.टी.ओ यांच्याकडून अनेक उपाययोजना आखल्या जातात. परंतु त्याचा फारसा उपयोग होत नाही. वाहन निर्मितीमध्ये आलेल्या अत्याधुनिकतेच्या वापरामुळे गाड्यांची इंजिन अतिशय ताकदवान आणि वेगवान बनली आहेत. चालकाचे वेगावर नियंत्रण राहात नसल्याने ठराविक स्पॉटला हे अपघात घडतात. त्यामध्ये दुरुस्ती करण्याच्यादृष्टीने उपाययोजना सुचवण्यात आल्या आहेत. 

दुरुस्ती तात्पुरती काय?
मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. भूसंपादनाचे काम ९५ टक्के झाले आहे. लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे महामार्गावरील ५६ ब्लॅक स्पॉटची तात्पुरती दुरुस्ती होणार की चौपदरीकरणाच्या फेऱ्यात हे काम अडणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

एकाच ठिकाणी ५ ते १० जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे, असे ५६ स्पॉट जिल्हा वाहतूक आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने निश्‍चित केले आहेत. या सर्व्हेचा अहवाल लवकरच वरिष्ठांना दिला जाणार आहे. 
- आयुब खान, वाहतूक निरीक्षक रत्नागिरी विभाग

Web Title: ratnagiri konkan news 56 black spot on national highway