सव्वाचारशे कोटींपैकी अवघे चार कोटी प्राप्त

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जानेवारी 2018

रत्नागिरी - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी आदर्श सांसद ग्राम योजनेंतर्गत निवडण्यात आलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील चार गावांतील कामांसाठी निधीचा तुटवडा आहे. ४१८ कोटी ४३ लाखांच्या मंजूर अंदाजपत्रकापैकी तीन वर्षात अवघे ४ कोटी १३ लाख प्राप्त झाले. निधीच मिळत नसल्याने आराखडा अद्यापही कागदावरच राहिला आहे.

रत्नागिरी - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी आदर्श सांसद ग्राम योजनेंतर्गत निवडण्यात आलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील चार गावांतील कामांसाठी निधीचा तुटवडा आहे. ४१८ कोटी ४३ लाखांच्या मंजूर अंदाजपत्रकापैकी तीन वर्षात अवघे ४ कोटी १३ लाख प्राप्त झाले. निधीच मिळत नसल्याने आराखडा अद्यापही कागदावरच राहिला आहे.

आदर्श ग्राम योजनेअंतर्गत जिल्ह्यातील चार गावांची निवड झाली. खासदार अमर साबळे यांनी आंबडवे (मंडणगड), गजानन कीर्तिकर यांनी आसूद (दापोली), हुसेन दलवाईंनी रामपूर (चिपळूण) आणि पीयूष गोयल यांनी गोळवली (संगमेश्‍वर) या गावांची निवड केली. तेथील विकास आराखडेही तयार झाले. आंबडवेचा ३७३ कोटींचा मोठा आराखडा असून त्यात एका रस्त्यासाठीच सर्वाधिक भाग ठेवण्यात आला आहे. आसूदसाठी २८ कोटी ४९ लाख, रामपूरसाठी १० कोटी ५ लाख आणि गोळवलीसाठी ८ कोटी ४१ लाखांचा आराखडा तयार करण्यात आला. या योजनेतील कामांसाठी केंद्र किंवा राज्य शासनाच्या अस्तित्वात असलेल्या योजनांमधून निधी द्यावा अशा सूचना आहेत; परंतु आराखडे तयार करताना अव्वाच्या सव्वा कामे हाती घेण्यात आल्याने ती कोठून करावयाची याबाबत प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे. खासदारांकडूनही याचा पाठपुरावा होणे आवश्‍यक आहे.

चार गावांसाठी ४१८ कोटींचा आराखडा तयार करण्यात आला. त्यापैकी शासनाकडून केवळ ४ कोटी १३ लाखांचा निधी प्राप्त झाला. त्यात मंडणगडसाठी १९ लाख ४२ हजार, आसूदसाठी १ कोटी ९६ लाख, रामपूरसाठी १८ लाख २२ हजार आणि गोळवलीसाठी १ कोटी ७९ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. प्राप्त निधीपैकी ९९ टक्के खर्ची टाकण्यात आला असून नव्याने काम हाती घेण्यासाठी निधीची प्रतीक्षाच आहे. 

निधीअभावी अनेक विभागांकडील कामे रखडली आहेत. जिल्हा नियोजन किंवा विविध योजनांमधून या कामांना प्राधान्य देण्यात आले आहे.

कामांचा लेखोजोखा
आराखड्यात कृषी विभागाची ५० कामे, जिल्हा परिषद २२१ कामे, सामाजिक वनीकरण ४, वन विभाग २, स्थानिक विभाग ९८ आणि इतर ४५ कामे आहेत. त्यातील कृषीची १४ कामे सुरू असून १६ पूर्ण झाली. जिल्हा परिषदेची २६ कामे सुरू, तर ७० कामे पूर्ण आहेत.

Web Title: ratnagiri konkan news aadarsh sansad gram scheme