माजी नगराध्यक्ष रवींद्र सुर्वे यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 ऑगस्ट 2017

रत्नागिरी - रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रवींद्र रामकृष्ण तथा भाऊ सुर्वे (वय ७८) यांचे आज सकाळी निधन झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. 

स्वच्छ चारित्र्याचे नगराध्यक्ष, विकासकामात कोणतेही पक्षीय राजकारण न आणणारे व सडेतोड बोलणारे म्हणून त्यांची ख्याती होती.

रत्नागिरी - रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रवींद्र रामकृष्ण तथा भाऊ सुर्वे (वय ७८) यांचे आज सकाळी निधन झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. 

स्वच्छ चारित्र्याचे नगराध्यक्ष, विकासकामात कोणतेही पक्षीय राजकारण न आणणारे व सडेतोड बोलणारे म्हणून त्यांची ख्याती होती.

सुर्वे गेले चार-पाच महिने श्‍वसनाच्या विकाराने त्रस्त होते. आठ दिवसांपासून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले होते. आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. जनसंघाचे कार्यकर्ते म्हणून त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. आणीबाणीच्या काळात त्यांनी तुरुंगवास भोगला होता. १९९१ ते १९९६ या काळात ते नगराध्यक्ष होते. तत्पूर्वी, अनेक वर्षे नगरसेवक होते. रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणारे शीळ धरण त्यांच्या काळात अस्तित्वात आले. 

८० फुटी हायवेची निर्मितीही त्यांच्याच कारकिर्दीत सुरू झाली. प्रशासनावर अंकुश ठेवणारे नगराध्यक्ष म्हणून त्यांची ओळख बनली होती. नगराध्यक्षपदाच्या कालावधीत भाऊंनी रत्नगिरीत येऊ घातलेल्या स्टरलाइटसारख्या प्रदूषणकारी प्रकल्पाला विरोध करणाऱ्या रत्नागिरीकरांच्या सर्वपक्षीय संघर्ष समितीचे नेतृत्व केले होते. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवारांनी स्वतः रत्नागिरीत येऊन सुर्वे यांचा उल्लेख करून हा प्रकल्प रद्द करण्याची घोषणा केली. माजी पंतप्रधान राजीव गांधी, माजी मुख्यमंत्री शरद पवार यांच्या राजकीय प्रभावाने ते काँग्रेसमध्ये प्रवेशकर्ते झाले. त्यानंतर अखेरपर्यंत ते काँग्रेसचे कार्यकर्ते राहिले. १९९५ मध्ये विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर त्यांनी निवडणूक लढवली; परंतु पक्षीय बंडखोरीमुळे त्यांना पराभव पत्करावा लागला. २०१४ मध्ये पालिका निवडणुकीत प्रचाराचा नारळ त्यांच्या हस्ते फोडला होता.

सुर्वे यांनी किराणा मालाची दुकाने सुरू केली. या व्यवसायातही त्यांनी प्रामाणिकपणा व कडक शिस्त पाळली. मुलींची छेडछाड करणाऱ्या रोडरोमिओंना त्यांनी धडा शिकवला. त्यांच्या मित्रमंडळींत आबालवृद्धांचा समावेश होता. मारुतीमंदिर येथील त्यांच्या निवासस्थानाहून सुर्वे यांची अंत्ययात्रा काढली. भागोजीशेठ कीर स्मशानभूीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. या वेळी सर्व स्तरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुर्वे यांच्या पश्‍चात दोन मुलगे, विवाहित मुलगी , सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

Web Title: ratnagiri konkan news ex. mayor ravindra surve death