रत्नागिरीऐवजी मासेमारीचा केंद्रबिंदू श्रीवर्धनकडे

राजेश शेळके
सोमवार, 5 जून 2017

तापमानातील बदल : पोषक वातावरणाकडे सरकले

तापमानातील बदल : पोषक वातावरणाकडे सरकले
रत्नागिरी - कोकणातील मासेमारीचा केंद्रबिंदू रत्नागिरीऐवजी श्रीवर्धनकडे सरकला आहे. वातावरणातील बदलाचा परिणाम म्हणून मासे पोषक वातावरणाकडे म्हणजे श्रीवर्धनकडे (रायगड) सरकले आहेत. नवरात्रोत्सवात सापडणारे काड, बोंबील, मोंदेल हे मासे आता अवेळी सापडू लागले आहेत. दर्जेदार माशांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. तज्ज्ञ आणि मच्छीमारांनीही याला दुजोरा दिला.

कोकणचा आर्थिक कणा असलेल्या मासेमारीचे उत्पन्न गेल्या सात ते आठ वर्षांत सातत्याने घटत आहे. मत्स्यदुष्काळ जाहीर करा, अशी मागणी जोर धरत होती; परंतु मत्स्योत्पादन घटण्याला मासेमारीतील पळवाटा आणि प्रामुख्याने पर्यावरणातील बदल कारणीभूत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

मासे समुद्रात 27 ते 30 डिग्री सेल्सिअस तापमानात राहतात. त्यात बदल झाला की पोषक भागात सरकतात. सध्या जिल्ह्यामध्ये हेच घडत आहे. त्यामुळे बंदरात, मच्छी मार्केटमध्ये विविध प्रजातीचे मासे कमी आढळतात. पूर्वी ठराविक हंगामातच विशिष्ट जातीचे मासे मिळत. नवरात्रोत्सवात बोंबील, मांदेली, काड असे सापडणारे मासे आता कोणत्याही हंगामात सापडतात. पूर्वी रत्नागिरी मासेमारीचा केंद्रबिंदू होता. अगदी परराज्यातील मच्छीमारही रत्नागिरीत येत होते; परंतु काही वर्षांपासून तापमान बदलामुळे येथे मिळणाऱ्या माशांची संख्या व त्यांच्या प्रजाती घटत चालल्या आहेत.

"पर्यावरणातील बदलाचा मासेमारीवर परिणाम झाला आहे. आठ ते दहा वर्षांपूर्वी रत्नागिरीत मोठ्या प्रमाणात मासे मिळत होते. आता ते सिंधुदुर्ग, गोव्याकडे सापडतात. पावस, पूर्णगड भागात कोळंबी, शेवंड मोठ्या प्रमाणात सापडत होते. आता ते या परिसरात अपवादानेच मिळतात. पापलेट, सुरमई, सरंगा हे दर्जेदार मासे मिळण्याचे प्रमाणही कमी झाले आहे.''
- फजलाणी, मच्छीमार, मिरकरवाडा.

Web Title: ratnagiri konkan news fishing center in shrivardhan