उन्‍हाच्‍या तापाचा विक्रमी लाभ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

आंबा, काजू बागायतदारांना पीक विम्‍यापोटी १६ कोटी प्राप्‍त

रत्नागिरी - जिल्ह्यात यावर्षीचा आंबा हंगाम बहूतांश बागायतदारांना लाभदायक ठरणारा होता; मात्र मार्च महिन्यात अचानक वाढलेल्या उष्णतेने फळांचा राजा अडचणीत आला होता. या तापाचा फायदा आंबा पीक विमा काढलेल्या बागायतदारांना मिळाला आहे. आंबा, काजूसाठी १० हजार ६०३ लाभार्थ्यांना १६ कोटी २७ लाखाचा लाभांश विमा कंपनीकडून त्या-त्या बागायतदारांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात आला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात लाभांश मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.

वातावरणातील बदलामुळे आंबा, काजू बागायतदारांचे दरवर्षी मोठे नुकसान होते. त्याला सामोरे जाण्यासाठी तत्कालीन शासनाने फळ पीक विमा योजना लागू केली. त्याचे निकषही निश्‍चित करण्यात आले होते. कमाल व किमान तापमान, पाऊस यावर विमा काढण्यात आला होता. त्यात कर्जदार बागायतदारांना विमा योजना अत्यावश्‍यक करण्यात आली. गेली चार वर्षे याचा लाभ अनेक बागायतदार घेत आहेत. वातावरणाच्या नोंदी ठेवण्यासाठी स्वयंचलित मापन केंद्र महसूल मंडळनिहाय बसविण्यात आली आहेत. 
किनारपट्टीजवळील आणि किनारपट्टीपासून १५ कि.मी.पेक्षा बाहेर अशा दोन विभागांचे वेगवेगळे निकष बनविण्यात आले. पहिल्या वर्षी शेतकऱ्यांना एकूण चार कोटी लाभांश मिळाला होता.

या हंगामामध्ये आंबा पीक चांगले होते; परंतु मार्च महिन्यात अचानक तापमानात बदल झाला. ३९ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमानाची नोंद चार दिवसांपेक्षा अधिक काळ झाली होती. त्यामुळे फळगळही मोठ्या प्रमाणात झाली. उन्हाच्या तापाचा हा फायदा विमा उतरविलेल्या बागायतदारांना झाला आहे. १० हजार ६०३ लाभार्थ्यांनी विमा उतरविला होता. त्यात काजू बागायतदारांचा टक्‍का अल्प आहे. प्राप्त लाभांशामध्ये आंब्यासाठी १५ कोटी १७ लाख तर काजूसाठी १ कोटी २७ लाख रुपयांचा समावेश आहे. मागील वर्षापेक्षा सर्वाधिक रक्‍कम रत्नागिरी जिल्ह्यातील बागायतदारांना मिळाली आहे.

...तेव्हा आंबा भाजला होता
जिल्ह्यातील तापमानात यावर्षी मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्याचबरोबर कमाल व किमान तापमानामधील अंतरही एकेक वेळी वीस अंश सेल्सिअसवर पोचले होते. दापोली ते राजापूरपर्यंतच्या पट्ट्यात सर्वत्रच यावर्षी कडाक्‍याची थंडी आणि कडाक्‍याचा उन्हाळा याचा ताप प्रामुख्याने आंब्याला झाला होता. आंबा भाजून निघाला होता. त्यामुळे झालेल्या नुकसानीपैकी काही अंश नुकसान विम्याच्या रकमेमुळे भरून निघाले आहे.

Web Title: ratnagiri konkan news mango cashew crop insurance profit