बहुसंख्य काँग्रेसजन देणार पक्षाला धक्‍का

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

रत्नागिरी - राणेसाहेब जो निर्णय घेतील, त्याला आमचा पाठिंबा राहील. आम्ही त्यांच्यासोबत कायम राहू, अशी ग्वाही रत्नागिरी तालुका काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह युवक, वाहतूक आणि एनएसयूआयच्या प्रमुखांनी पत्रकार परिषदेत दिली. शिवसेनेतून येताना मुख्यमंत्रीपदाचे दिलेले आश्‍वासन काँग्रेसने पाळले नाही. उलट काँग्रेसमधील वरिष्ठ मंडळी त्यांना विकासकामे करण्यापासून रोखत आहेत, असा आरोप या वेळी करण्यात आला.

आमदार नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाबाबत गेले काही दिवस जोरदार चर्चा सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर रत्नागिरी तालुक्‍यातील कट्टर राणे समर्थकांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. या वेळी तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष आनंद साळवी, महादेव आखाडे, युवक तालुकाध्यक्ष मेहताब साखरकर, युवकचे विधानसभा उपाध्यक्ष संकेत चवंडे, अशोक वाडेकर, एनएयूआयचे शामसुंदर यांच्यासह कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

दूरचित्रवाणीवरून राणेंच्या प्रवेशाची बातमी आम्ही पाहिली. त्यानंतर माजी खासदार नीलेश राणे यांच्याशी संवाद साधला. राणेसाहेब घेतील तो निर्णय मान्य आहे. त्यांच्या मागे ठामपणे उभे राहू, असे नीलेश यांना सांगितले. त्यानंतर राणेसमर्थक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांशीही संवाद साधला. त्यात तालुक्‍याचे प्रभारी विकास पाटील, सचिन आचरेकर, दीपक राऊत यांनीही पाठिंबा व्यक्‍त केला. वैयक्‍तिक कामामुळे ते पत्रकार परिषदेला उपस्थित नाहीत, असे श्री. वाडेकर यांनी सांगितले. 

कोकणच्या या ताकदवान नेत्याला संपवायचा कट पक्षातीलच वरिष्ठांनी सुरू केला. काँग्रेसमध्ये आल्यानंतर गणपत कदम, सुभाष बने हे आमदार म्हणून निवडून आले. नीलेश राणे खासदार झाले. 

कोकणात काँग्रेस वाढविण्याची किमया राणेंमुळे घडली. याचा विसर पक्षश्रेष्ठींना पडला. राणेंना मोठे होऊ न देण्यासाठी त्यांच्याविरोधात राजकारण सुरू झाले, असा आरोपही श्री. वाडेकर यांनी केला.

कोकणातील विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी राणेंनी प्रयत्न सुरू केले. आंबा, काजू, मच्छी यांच्यासह विकासाचे विविध प्रश्‍न सोडविण्यासाठी त्यांनी पावले उचलली. त्यांना मदत करण्याऐवजी रोखण्याचाच प्रयत्न पक्षात झाला. गावागावातील, वाडीवस्तीवरील अनेक काँग्रेसचे कार्यकर्ते राणे जेथे जातील, तेथे जाण्यास सज्ज आहेत, असे त्यांनी सांगितले.

Web Title: ratnagiri konkan news politics in congress