'शिवशाही' पनवेलमध्येच ठप्प!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 जून 2017

दुसऱ्याच दिवशी शिंकली माशी - मदतीला धावली निमआराम गाडी

दुसऱ्याच दिवशी शिंकली माशी - मदतीला धावली निमआराम गाडी
रत्नागिरी - मोठा गाजावाजा करून सुरू केलेली वातानुकूलित "शिवशाही' एसटी बस दुसऱ्याच दिवशी पनवेलच्या पुढे काही जाईना. त्यामुळे खासगी सेवेशी स्पर्धा करण्याचा दावा करणाऱ्या एसटी महामंडळाचे वस्त्रहरणच झाले आणि त्यातील प्रवासी निमआराम गाडीने रत्नागिरीकडे पाठवण्याची वेळ आली शिवाय एसटीला तिकिटाचा परतावाही द्यावा लागला.

आलिशान "शिवशाही'च्या प्रवासाला दुसऱ्याच दिवशी माशी शिंकली. मुंबईतून सुटल्यानंतर काल (ता.11) रात्री पनवेल येथे तांत्रिक बिघाडामुळे ही बस बंद पडली. वातानुकूलन यंत्रणेत बिघाड झाल्याचे प्रवाशांना सांगण्यात आले. त्यामुळे तेथून प्रवाशांना दुसऱ्या निमआराम बसने रत्नागिरीत आणण्याची व्यवस्था करावी लागली. झालेल्या या प्रकाराचा अहवाल वरिष्ठ कार्यालयास देण्यात आला आहे. प्रवासी वाढवण्यासाठी सुरू केलेल्या या सेवेत खंड पडता कामा नये, अशा सक्त सूचनाही संबंधित कंपनीस देण्यात आल्या आहेत.

एसटी महामंडळाने "शिवशाही' बस खासगी कंपनीकडून चालवण्यास घेतल्या आहेत. या बसवर त्या कंपनीचाच चालक आहे. वाहक एसटी महामंडळाचा आहे. काल या एसटीचे रत्नागिरीत जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले होते. ही बस सुरळीत मुंबईपर्यंत पोहोचली. त्याच वेळी मुंबईतून रत्नागिरीत येणारी बस पनवेल येथे कमी गतीने पळत होती. पनवेल येथे आल्यानंतर वातानुकूलन यंत्रणेतील बिघाडामुळे ती तेथेच थांबवण्यात आली. बसमध्ये 45 प्रवासी होते. यामुळे सर्व प्रवाशांना तिकिटाच्या फरकातील रक्कम एसटीकडून देण्यात आली. रत्नागिरीत आल्यानंतर काही प्रवाशांकडून ही माहिती मिळाली. कोकणातून मुंबईला जाणाऱ्या गर्दीचा हंगाम संपल्यानंतर "शिवशाही' सुरू करण्यामध्ये एसटीने कोणती दूरदृष्टी दाखवली असा सवालही प्रवाशांनी केला.

प्रवाशांचा चांगला प्रतिसाद
याबाबत विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, की "शिवशाही'ला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पुढील दिवसांचे आरक्षणही झाले. काल तांत्रिक बिघाडामुळे बस पनवेलला थांबवावी लागली. मात्र प्रवाशांची व्यवस्था करण्यात आली. यापुढे असे होता कामा नये याकरिता वरिष्ठ कार्यालयात याची माहिती देण्यात आली आहे.

Web Title: ratnagiri konkan news shivshahi bus problem in panvel