विद्यापीठात विद्यार्थ्यांची निदर्शने

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 जून 2017

रत्नागिरी - मुंबई विद्यापीठाच्या गलथान व बेभरवशी कारभारामुळे या वर्षीही तृतीय वर्षाचा निकाल अद्यापही लागलेला नाही. याविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने जाहीर केल्याप्रमाणे उपकेंद्राच्या बाहेर जोरदार निदर्शने केली. कुलगुरू आणि शिक्षणमंत्र्यांचा पुतळा दहन करून निषेध व्यक्त केला. ३० जूनपर्यंत निकाल जाहीर न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र केले जाणार असल्याचे या वेळी घोषित करण्यात आले.

रत्नागिरी - मुंबई विद्यापीठाच्या गलथान व बेभरवशी कारभारामुळे या वर्षीही तृतीय वर्षाचा निकाल अद्यापही लागलेला नाही. याविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने जाहीर केल्याप्रमाणे उपकेंद्राच्या बाहेर जोरदार निदर्शने केली. कुलगुरू आणि शिक्षणमंत्र्यांचा पुतळा दहन करून निषेध व्यक्त केला. ३० जूनपर्यंत निकाल जाहीर न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र केले जाणार असल्याचे या वेळी घोषित करण्यात आले.

मुंबई विद्यापीठाअंतर्गत तीन जिल्ह्यांमध्ये ६५० हून अधिक महाविद्यालये कार्यरत आहेत. दरवर्षीप्रमाणे परीक्षा विभागाने तृतीय वर्षाच्या परीक्षांचा निकाल अद्यापही जाहीर केलेला नाही. यामुळे या विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. पदव्युत्तर शिक्षण प्रवेश किंवा नोकरी, पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे कठीण झाले आहे.

विद्यापीठाच्या या भोंगळ कारभाराबाबत आतापर्यंत अनेकदा ‘अभाविप’ने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. निकाल लवकर लावण्याबाबतची अनेक निवेदने देऊनही प्रशासनाला त्याचे गांभीर्य नसल्याचे दिसून आले आहे. कुलगुरूंनी कोणतीही कार्यवाही केलेली नाही. यामुळेच पुन्हा एकदा ‘अभाविप’ने आंदोलनाचा इशारा दिला होता. त्याप्रमाणे ‘अभाविप’च्या कार्यकर्त्यांनी आज उपकेंद्रात विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.

त्यानंतर कुलगुरू व शिक्षणमंत्र्यांचा पुतळाही दहन करण्यात आला. विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांचा अंत पाहू नये. येत्या ३० जूनपर्यंत निकालाची तारीख जाहीर न केल्यास कुलगुरूंचे नंबर सर्व विद्यार्थ्यांना देण्यात येईल, असा इशारा विद्यापीठ प्रशासनाला देण्यात आला.

या वेळी निकालाची तारीख जाहीर करा, निष्काळजी विद्यापीठाची, वाट लागली विद्यार्थ्यांच्या भविष्याची, जोर जुल्म के टक्कर में, संघर्ष हमारा नारा हैं अशा घोषणांनी विद्यापीठ उपकेंद्र परिसर दणाणून गेला. या आंदोलनात ‘अभाविप’चे कोकण प्रांत सहमंत्री साईजित शिवलकर, ऋषीकेश सावंत, श्रीजित वेलणकर, संकेत देवस्थळी, प्रेरणा पवार, नम्रता शिंदे, ओंकार कोकजे, विक्रांत सनगरे, सोनाली पाटील आदींसह अन्य कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.

तावडेंविरोधात ‘अभाविप’...
शिक्षणमंत्री विनोद तावडे हे ‘अभाविप’च्या मुशीतून तयार झालेले भाजपचे नेते व मंत्री आहेत. विद्यार्थ्यांचे प्रश्‍न त्यांना जवळून माहिती आहेत व ते सोडवण्यासाठी काय काय करावे लागते याचीही त्यांना माहिती आहे; परंतु आज त्यांचा पुतळा जाळण्याची वेळ ‘अभाविप’वर आली. भविष्यात ‘अभाविप’ने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

Web Title: ratnagiri konkan news student agitation in university