
१०० वैद्यकीय अधिकाऱ्यांचे आर्थिक लाभ गेले ६ महिने देण्यात आलेले नाहीत.त्यामूळे कुटुंबामधून चिंता व्यक्त करण्यात येत आहे...
रत्नागिरीत 'या' वैद्यकीय अधिकाऱ्यांना मिळाले नाही वेतन....
रत्नागिरी : जिल्ह्यातील सुमारे १०० वैद्यकीय अधिकाऱ्यांचे गेल्या ६ महिन्यापासून पगारच झालेले नाहीत. त्यांच्या कुटुंबामधून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. हे वेतन तत्काळ अदा करण्याबरोबरच अन्य मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट अ (मॅगमो) संघटनेने प्रशासनाला दिले आहे. याची दखल उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी घेतली. लवकरच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याबरोबर याबाबत बैठक लावून हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
मॅगमो संघटनेचे अध्यक्ष डॉ. भगवान पितळे यांनी यासंदर्भात माहिती दिली. ते म्हणाले, वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या मागण्यांविषयी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्ष, आरोग्य सभापती, जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. १०० वैद्यकीय अधिकाऱ्यांचे आर्थिक लाभ गेले ६ महिने देण्यात आलेले नाहीत. लवकरात-लवकर हे लाभ मिळावेत, वैद्यकीय अधिकाऱ्यांना जिल्हा रूग्णालय व जिल्हा परिषद कार्यालयात सौजन्याची वागणूक मिळावी, योग्य कारणासाठी या अधिकाऱ्यांना वेळोवेळी रजा देण्यात याव्यात, अशा प्रमुख मागण्यांचा या निवेदनात समावेश आहे.
हेही वाचा- अरे वा : आता देवरुखात उडणार सुखोई, मिराज....
तोंडी आदेश टाळले पाहिजे....
तसेच सेवांतर्गत पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे प्रस्ताव वेळेत वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात यावेत. हे प्रस्ताव विशिष्ट कालमर्यादेत रवाना झालेच पाहिजेत. पदव्युत्तर अभ्यासक्रमानंतर देय लाभ वेळीच देण्यात यावेत. अनेकवेळा तोंडी आदेश देऊन कारभार करण्यात येतो, हे टाळले पाहिजे. अपेक्षित कामकाज लेखी आदेशाद्वारे करण्यात यावे, असे मॅगमो’ संघटनेने आग्रहपूर्वक नमूद केले आहे. नवे सरकार येऊन दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटला असून आता प्रलंबित देणी अदा करण्यात यावीत, असे संघटनेने म्हटले आहे.
हेही वाचा- Republic Day 2020 : येथून निघाले दोघे सायकलस्वार त्यांनी गाठले दिल्लीचे द्वार..
आम्हीही संवेदनशील
दरम्यान, विविध मागण्यांबाबत उदय सामंत यांनी याची दखल घेतली. ते म्हणाले, जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेबाबत आम्हीही संवेदनशील आहोत. लवकरच वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या वेतनाचा विषय आणि रिक्त पदे भरण्याबाबत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना भेटणार आहे.