गुहागर तालुक्‍यात १९० शाळा क्रीडांगणाविना

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017

गुहागर - तालुक्‍यातील जिल्हा परिषदेच्या मालकीच्या एकूण २०५ प्राथमिक व २० केंद्रशाळा आहेत. त्यापैकी १९० शाळांना क्रीडांगणच नाही. अशा परिस्थितीत मुलांना किमान खेळण्याची सुविधा नसल्याने खेळाडू घडवण्याची भाषा किती पोकळ आहे, याचा पडताळा आला आहे. जिल्हा परिषदेच्या एका अहवालात ही बाब उघड झाली.

गुहागर - तालुक्‍यातील जिल्हा परिषदेच्या मालकीच्या एकूण २०५ प्राथमिक व २० केंद्रशाळा आहेत. त्यापैकी १९० शाळांना क्रीडांगणच नाही. अशा परिस्थितीत मुलांना किमान खेळण्याची सुविधा नसल्याने खेळाडू घडवण्याची भाषा किती पोकळ आहे, याचा पडताळा आला आहे. जिल्हा परिषदेच्या एका अहवालात ही बाब उघड झाली.

यामध्ये पहिली ते चौथी व पहिली ते सातवीच्या शाळांचा समावेश आहे. गेल्या वर्षी शिक्षण विभागाने शैक्षणिक माहिती प्रणालीवर आधारित संक्षिप्त सांख्यिकीय माहितीचा अहवाल जिल्हा परिषदेला सादर करून तो शासनाकडे पाठवला. यातूनच तालुक्‍यातील १९० शाळांना हक्काचे क्रीडांगण नसल्याची बाब पुढे आली आहे. जिल्हा परिषद खासगी अनुदानित विनाअनुदानित प्राथमिक शाळांची माहिती एकत्रित केली. त्यावेळी क्रीडांगणासह अनेक बाबी उघड झाल्या. तालुक्‍यातील अनेक प्राथमिक शाळा आजही भौतिक व शैक्षणिक सुविधांपासून वंचित आहेत.

तालुक्‍यातील बीट व केंद्रस्तरीय हिवाळी स्पर्धा शाळेच्या शेजारी असणाऱ्या शेतामध्ये घेतल्या जातात. शिक्षकांनीही याला दुजोरा दिला. एकीकडे शहरी भागात इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे पेव फुटत असताना आणि ग्रामीण भागातील पालकांची पसंतीही या शाळांना वाढत असल्याने मराठी शाळांमध्ये पटसंख्येचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यात अशा असुविधांमुळे प्रतिमा अधिक खराब होते.

मराठी शाळांमधील पटसंख्या वाढावी यासाठी सर्व शिक्षण अभियानातून करोडो रुपयांचा चुराडा करून, विविध योजना आकर्षक इमारती सर्व प्रकारचे साहित्य आदी उपलब्ध करून देण्यात येते. क्रीडांगणेच नसल्यामुळे हा मुद्दा सरकारी शाळांविरोधात जातो. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी पालक पाल्याला खासगी शाळांमध्ये पाठवतात.

शासनाकडून विद्यार्थ्यांचे क्रीडा गुण विकसित करण्यासाठी योजना राबविल्या जातात. यामध्ये खेळाडू निर्माण व्हावेत यासाठी शासनाच्या क्रीडा विभागाकडून क्रीडांगण विकासासाठी १ लाखाचे अनुदान प्रत्येक शाळेला दिले जाते. त्यातून क्रीडा साहित्य, क्रीडांगण निर्मिती आदीचा खर्च होतो. मात्र, शाळांमध्ये क्रीडांगणेच नाहीत, तेथे अनुदान मिळायचे कशाला अशी वस्तुस्थिती आहे.

क्रीडांगणे नसलेल्या शाळेतील मुलांचा खेळाचा तास हा आजुबाजुच्या शेताच्या मळ्यात जातो. पावसानंतरही डिसेंबरपर्यंत या मळ्यांमध्ये शेती असल्याने, याचा काहीच उपयोग होत नाही. शैक्षणिक वर्षाचा विचार करता, मार्चनंतर परीक्षा सुरू होतात. परिणामी विद्यार्थ्यांना केवळ दोन महिनेच आजुबाजूच्या जागांचा वापर करता येतो.

१५ शाळांमध्ये छोटी क्रीडांगणे
गुहागर तालुक्‍यातील १५ शाळांमध्ये छोटी क्रीडांगणे आहेत. मात्र, तालुक्‍याला सुसज्ज असे एकही क्रीडांगण नाही. तालुक्‍यामधून शासनावर टीकेची झोड उठवली जाऊनही संबंधीत वरिष्ठ अधिकऱ्यांनी ही बाब लक्षात घेतलेली नाही. तालुक्‍यात किमान एक तरी सुसज्ज क्रीडांगण मिळावे अशी मागणी दीर्घकाळ दुर्लक्षित राहिली आहे.

Web Title: Ratnagiri News 190 schools without a playground