महामार्ग चौपदरीकरणात ५६ हजार वृक्षांची तोड

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 डिसेंबर 2017

रत्नागिरी - मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी संपादित केलेल्या जमिनीतील वृक्ष तोडण्यास ठेकेदारांकडून सुरवात झाली. चिपळूण ते लांजा या भागांतील ५५ हजार ८८९ झाडे तोडण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली.

रत्नागिरी - मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी संपादित केलेल्या जमिनीतील वृक्ष तोडण्यास ठेकेदारांकडून सुरवात झाली. चिपळूण ते लांजा या भागांतील ५५ हजार ८८९ झाडे तोडण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली. वृक्षतोडीसाठी ठेकेदाराने वन विभागाची परवानगी घेतली असून शासनाकडे २६ लाख रुपये भरले आहेत. येत्या दोन महिन्यांत टप्प्याटप्प्याने प्रत्यक्ष कामाला सुरवात होऊ शकते.

माणगाव ते कुडाळ ३६६.१७ किलोमीटरचे चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी ११ हजार ७३५ कोटी रुपये लागणार आहेत. सध्या भूसंपादन प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. चिपळूण, संगमेश्‍वर, रत्नागिरी आणि लांजा या चार तालुक्‍यांतील मोबदला वाटप वेगाने सुरू आहे. बहुतांश प्रकरणे तडजोडीने सोडविण्यावर महसूल प्रशासनाने भर दिला आहे. उर्वरित प्रकरणे न्यायालयाकडे सुपूर्द केली आहेत. तक्रार नसलेल्या पण परजिल्ह्यात वास्तव्यास असलेल्यांचे, मृत झाल्याचे कळले नाही अशांचे धनादेश अद्यापही पडून आहेत. त्यांना प्रांत कार्यालयाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. ८० टक्‍के काम पूर्ण झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
चिपळूण तालुक्‍यातील आरवली, असुर्डेजवळील काही भागांतील झाडे तोडण्यास सुरुवात झाली आहे. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने हे काम सुरू आहे. काही भागांतील जमीन समतल करण्यासाठी जेसीबी, रोलर ठेवण्यात आला आहे. महामार्गावरील मोठी झाडे तोडताना मनुष्यबळ असले तरीही आवश्‍यक यंत्रे उपलब्ध नाहीत. असुर्डेनजीक भलेमोठे झाड बुधवारी (ता. ६) सायंकाळी तोडण्याचे काम सुरू होते. ते झाड महामार्गावर पडले. तुटलेले झाड बाजूला करण्यासाठी जेसीबी ठेवला असता तर काही क्षणात मार्ग मोकळा झाला असता; परंतु एक छोटी इलेक्‍ट्रिक करवत घेऊन झाडाच्या फांद्या तोडण्याचे काम सुरू होते. त्यामुळे महामार्गावर प्रवाशांचा खोळंबा झाला होता. दोन्ही बाजूंची वाहतूक थांबून ठेवण्यात आली होती. याबद्दल प्रवासी नाराज होते. महामार्गावरील मोठे वृक्ष तोडताना आवश्‍यक साहित्य बाळगून कार्यवाही करणे आवश्‍यक आहे; अन्यथा वाहतूक कोंडीचा त्रास पुढील काही महिने सहन करावा लागू शकतो. 

सुरुवातीला आरवली ते तळेकांटे ४० किलोमीटर परिसरात १८ हजार ५७७ आणि तळेकांटे ते वाकेड या ५०.९० किलोमीटरमधील २७ हजार ४०८ झाडे कापण्याचा प्रस्ताव पाठविला होता; परंतु फक्‍त रस्त्यासाठी आवश्‍यक जागेवरील झाडे तोडावीत, असे नवीन आदेश शासनाने काढले. त्यामुळे फेरसर्वेक्षण करण्यात आले. नवीन आदेशानुसार चिपळूण, संगमेश्‍वर, रत्नागिरी व लांजा तालुक्‍यांतील ५५ हजार ८८९ झाडे तोडण्यास वन विभागाने परवानगी दिली. ही झाडे लवकरच तोडली जातील, असे बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले. नवीन सर्वेक्षणामुळे पन्नास हजारहून अधिक झाडे वाचली आहेत.

पुनर्रोपणाचा प्रस्ताव बारगळला
महामार्गावरील ६ हजार ८९० झाडांचे पुनर्रोपण करण्याचा निर्णय सुरुवातीला झाला होता; मात्र निविदेला प्रतिसाद न मिळाल्यामुळे हायड्रोलिक मशिन्सद्वारे झाडे मुळासह काढून ती अन्यत्र बसविण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे.

महामार्गासाठी तोडली जाणारी झाडे
            विभाग           वृक्षांची संख्या

  • रत्नागिरी-लांजा     २३,३५५
  • चिपळूण             १४,४२६
  • संगमेश्‍वर            १८,१०८

संगमेश्‍वरचे खड्डे ‘जैसे थे’
मुंबई-गोवा महामार्गावरील बहुतांशी खड्डे ठेकेदाराकडून भरण्यात आले आहेत. संगमेश्‍वरमधील खड्डे अद्यापही ‘जैसे थे’ आहेत. त्याचबरोबर रत्नागिरी ते कोल्हापूर महामार्गावर आंबा घाटापर्यंतच्या रस्त्यांवरील खड्डे तत्काळ भरण्यात आले.

 

Web Title: Ratnagiri News 56 thousand Tree cutting for Highway