रत्नागिरी जिल्ह्यात भात उत्पादनात हेक्‍टरी ८०० किलोंनी वाढ

मुझफ्फर खान
बुधवार, 31 जानेवारी 2018

पूर्वी हेक्‍टरी २३०० किलो भाताचे उत्पादन घेतले जात होते; मात्र आधुनिक तंत्रज्ञान आणि मार्गदर्शनामुळे हेक्‍टरी ३१०० किलो भाताचे उत्पन्न घेतले जात आहे. जिल्ह्यातील शेतकरी हेक्‍टरी ८०० किलो भाताचे अधिक उत्पन्न घेत आहेत. 

चिपळूण - रत्नागिरी जिल्ह्यातील भातलागवडीचे क्षेत्र एकूण उद्दिष्टापैकी ६ हजार ५४४ हेक्‍टर कमी झाले आहे. जिल्ह्यातील काही शेतकरी भातशेती सोडून बागायतीकडे वळले आहेत, तर काहींचा नवीन तंत्रज्ञानाच्या आधारे कमी क्षेत्रात भाताचे जास्त उत्पादन घेण्याकडे कल आहे. त्याचा हा परिणाम आहे.

पूर्वी हेक्‍टरी २३०० किलो भाताचे उत्पादन घेतले जात होते; मात्र आधुनिक तंत्रज्ञान आणि मार्गदर्शनामुळे हेक्‍टरी ३१०० किलो भाताचे उत्पन्न घेतले जात आहे. जिल्ह्यातील शेतकरी हेक्‍टरी ८०० किलो भाताचे अधिक उत्पन्न घेत आहेत. 

भातपिकाच्या उत्तम वाढीसाठी आणि भरघोस उत्पादनासाठी उष्ण व दमट असे अनुकूल हवामान जिल्ह्यात आहे. सध्या सातत्याने त्यात बदल जाणवतो. भात शेतीवर हवामानाच्या घटकांचे परिणाम जाणवतो. त्यावर उपाय म्हणून कृषी विभागाने गरजेनुसार विविध गुणधर्मांच्या जाती विकसित केल्या आहेत. त्यातून उत्पादन वाढवण्यावर भर दिला आहे.
- शिवाजीराव जगताप,
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

शेती परवडत नाही म्हणून राज्याच्या काही भागातील शेतकरी शेती सोडत आहेत, तर शेतीकर्जाच्या ओझ्याखाली दबलेले शेतकरी आत्महत्या करीत आहेत. मात्र, जिल्ह्यातील शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे आत्मसात करून शेतीत नवनवीन प्रयोग करीत आहे. शेतीला पूरक उद्योगही करू लागले आहेत, हे कृषी विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. 

भातशेती हे जिल्ह्यातील प्रमुख पीक आहे. पावसाळी आणि 
पाण्याच्या उपलब्धतेनुसार उन्हाळी हंगामात भातशेती केली जाते. मागील पावसाळी हंगामात कृषी विभागाने जिल्ह्यात ७४ हजार ७३८ हेक्‍टर क्षेत्रावर भातशेतीचे उद्दिष्ट ठरविले होते. प्रत्यक्षात ६८ हजार १९४ हेक्‍टर क्षेत्रावर भात लागवड झाली. पावसाची अनियमितता, लहरी हवामान, पूरपरिस्थिती आणि वन्यप्राण्यांकडून होणारा त्रास आदी कारणांमुळे शेतकरी भातशेती सोडत आहेत. त्यामुळे भातशेतीचे क्षेत्र एका वर्षात ६ हजार ५४४ हेक्‍टरने कमी झाले. हे सत्य असले तरी हेक्‍टरी उत्पादन घेण्यात जिल्ह्यातील शेतकरी आघाडीवर आहे, असा दावा कृषी विभागाकडून केला जात आहे.

कृषी विभागाने शेतकऱ्यांना हायब्रीड बियाणे, खत व्यवस्थापन, चारसूत्री लागवडीकडे वळविले आहे. भात जातीचे प्रमाणित बियाणे खरेदी केले असेल तर बियाण्यांवर प्रक्रिया करावयाची आवश्‍यकता नाही. मात्र, शेतकऱ्यांकडील बियाण्यास प्रक्रिया करण्याची आवश्‍यकता असते. उन्हाळी हंगामातील जास्त तापमान व कमी आर्द्रतेमुळे कीटक व रोगराईचे प्रमाण खरिपापेक्षा रग्बीत कमी राहते. जमिनीचा पोत सुधारण्यासाठी व जास्तीत जास्त भातपिकाचे उत्पादन मिळविण्यासाठी किती खत वापरले जावे, भात लावणीच्या वेळी आणि लावणीनंतर त्याचे प्रमाण किती असावे, लावणीनंतर पाण्याचे व्यवस्थापन कसे करावे याचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना दिले जाते.

Web Title: Ratnagiri News 800 KG per Hecter increase in rice production