देवरुखमध्ये महागाईविरोधात शिवसेनेचा मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017

देवरूख - गगनाला भिडलेल्या महागाईविरोधात केंद्र सरकारचा निषेध करणाऱ्या शिवसेनेच्या निषेध मोर्चाने आज देवरूख शहर दणाणले. सरकारविरोधी घोषणा देत शिवसेनेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले. रवींद्र माने यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.

देवरूख - गगनाला भिडलेल्या महागाईविरोधात केंद्र सरकारचा निषेध करणाऱ्या शिवसेनेच्या निषेध मोर्चाने आज देवरूख शहर दणाणले. सरकारविरोधी घोषणा देत शिवसेनेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले. रवींद्र माने यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.

तब्बल १० वर्षांनी रवींद्र माने आणि सुभाष बने ही जोडगोळी मोर्चाच्या निमित्ताने शिवसेनेत एकत्र आल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारल्याचे चित्र होते. रवींद्र मानेंबरोबर शिवसेनेत प्रवेश न केलेल्या सौ. नेहा माने याही मोर्चात सहभागी झाल्या. शिवाय निवेदन देताना त्या सर्वांसोबत होत्या. त्यामुळे सौ. मानेंच्या सेना प्रवेशाचा सस्पेन्स संपल्याचे स्पष्ट झाले. सकाळी ११ वाजता शहरातील मराठा भवनपासून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली.

मोर्चाचे नेतृत्व माजी राज्यमंत्री रवींद्र माने, माजी आमदार सुभाष बने यांनी केले. त्यांच्यासह आमदार सदानंद चव्हाण, जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, तालुकाप्रमुख प्रमोद पवार, सौ. नेहा माने, जि.प. उपाध्यक्ष संतोष थेराडे, रोहन बने, पंचायत समिती सभापती सारिका जाधव, उपसभापती दिलीप सावंत, वेदा फडके, सहदेव बेटकर, रचना महाडिक, माधवी गीते, मुग्धा जागुष्टे, रजनी चिंगळे, जया माने, बंड्या बोरुकर, पं.स. सदस्य छोट्या गवाणकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते. 

मराठा भवनपासून राममंदिर, शिवाजी चौक, मातृमंदिर चौक, माणिक चौकातून बाजारपेठ, बस स्थानक, स्टेट बॅंक रोड मार्गे हा मोर्चा तहसील कार्यालयासमोर नेण्यात आला. ‘कोण म्हणतो देणार नाही, महागाई कमी केल्याशिवाय राहणार नाही’, ‘वाढलेली महागाई कमी करा नाहीतर खुर्च्या खाली करा’, ‘संपूर्ण कर्जमुक्‍ती झालीच पाहिजे’, अशा घोषणा देत शिवसैनिकांनी देवरूख शहर दणाणून सोडले. तहसीलदार संदीप कदम यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महागाईने जनता त्रस्त झाली असून जीवनावश्‍यक वस्तूंचे दर तातडीने कमी झाले पाहिजेत. आंदोलनाचा हा पहिला टप्पा असून शासनाने महागाई कमी केली नाही, तर सर्वसामान्यांना बरोबर घेऊन मैदानात उतरण्याचा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला.

 

Web Title: Ratnagiri news agitation against Inflation in Devrukh