संगमेश्वर तालुक्यातील मारळमध्ये अणेराव बंधूंचा ‘मसाले’दार प्रयोग

संदेश सप्रे
मंगळवार, 23 जानेवारी 2018

देवरूख - नोकरी करू नका, हा वडिलांचा कानमंत्र त्यांनी प्रत्यक्षात उतरवला. तीन भावंडांनी एकत्र येत कोकणात मसाले पिकांच्या बागायतीचा प्रयोग यशस्वी केला. संगमेश्‍वर तालुक्‍यातील मारळ गावातील अणेराव बंधूंचा हा प्रयोग कोकणातील पारंपरिक शेतीला नवा आयाम देणारा ठरणार आहे.

देवरूख - नोकरी करू नका, हा वडिलांचा कानमंत्र त्यांनी प्रत्यक्षात उतरवला. तीन भावंडांनी एकत्र येत कोकणात मसाले पिकांच्या बागायतीचा प्रयोग यशस्वी केला. संगमेश्‍वर तालुक्‍यातील मारळ गावातील अणेराव बंधूंचा हा प्रयोग कोकणातील पारंपरिक शेतीला नवा आयाम देणारा ठरणार आहे.

मारळसारख्या दुर्गम भागात राहून संजीव, सुबोध, मनीष अणेराव या तिघांनाही वडिलांनी नोकरी न करण्याचा सल्ला दिला. पदवीधर झालेल्या तीन भावांनी वडिलांचा सल्ला मोलाचा मानत शेतीतच करिअर करण्याचा निर्णय घेतला. १३ एकर जागेवर त्यांनी काजू, आंबा, नारळ यांची लागवड केली. यातून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने या बागायतीत आंतरपीक 
म्हणून मसाले पिकांची लागवड करण्याचे ठरले. कोकण कृषी विद्यापीठाचे मार्गदर्शन घेत त्यांनी लाखीबाग विकसित करत ११ एकरात  बागेत दालचिनी, काळी मिरी, जायफळाची लागवड केली. 

जमिनीचा पोत समजून लागवड केली आणि त्यासाठी कृषितज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले, तसेच स्वतः कष्ट करून झोकून देण्याचे ठरवले तर कोकणच्या लाल मातीत कोणतेही उत्पादन घेता येणे शक्‍य आहे. यासाठी शेतकऱ्यांनी मानसिकता बदलली पाहिजे.
- सुबोध अणेराव,
बागायतदार 

एक एकरमध्ये आठ बाय आठ वरती नारळाची झाडे, त्यावर काळी मिरीचे दोन वेल असे १२४ झाडांवर काळी मिरी, १२६ झाडांवर दालचिनी, तर जायफळाची ६२ झाडे त्यांनी लावली. वर्षभरातच त्यांना उत्पादन मिळू लागले. ठिबक सिंचनद्वारे त्यांनी पाणी दिले. कोकणातील ठिबक स्प्रिंक्‍लर्सचा प्रयोग त्यांनी लवकर केला. काळी मिरीसाठी केरळमध्ये प्रसिद्ध असलेली पेन्युर वन, दालचिनीसाठी तेज आणि जायफळासाठी कोकण सुगंधा जात त्यांनी लावली आहे.

मुंबईतील मॉलमध्येही मागणी
एका एकरात नारळापासून ८६ हजार, काळी मिरीपासून १ लाख ५ हजार, दालचिनीपासून ३७ हजार, जायफळापासून १ लाख २४ हजारांचे उत्पन्न त्यांना मिळाले. ३ लाखांपेक्षा जास्त नफा झाला. विक्रीसाठी ते स्थानिक बाजारपेठेचाच आसरा घेतात. कोकणातील विशिष्ट चवीच्या या मसाला पिकांना मुंबईतील मॉलमधेही चांगली मागणी आहे.   

काळी मिरीची पद्धत कोकणात सर्वत्र माहिती आहे. दालचिनीचे तयार झाड करवतीने कापून त्यावर एक फुटाचे तुकडे केले जातात. त्याला उभे-आडवे छेद देऊन सुकलेली दालचिनी खोडापासून वेगळी करून वाळवली जाते. जायफळ थेट झाडावरून काढून बाजारात पाठवले जाते.
 

Web Title: Ratnagiri News Anekrao Brothers success story