पदवीधर निवडणुकीत काँग्रेसकडे राष्ट्रवादीचे दुर्लक्ष - अशोक जाधव

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 जून 2018

देवरूख - कोकण पदवीधर मतदार संघातील निवडणुकीसाठी रत्नागिरी जिल्ह्यात राष्ट्रवादीला काँग्रेसची गरज नसुन काँग्रेसमधील कुणालाही या प्रक्रियेत विश्‍वासात घेतले जात नसल्याचा आरोप जिल्हा प्रवक्ता अशोक जाधव यांनी केला. या प्रकाराने काँग्रेस कार्यकर्ते संतापले असून आम्ही ऐनवेळी वेगळा निर्णय घेण्यास सक्षम असल्याचे त्यांनी सांगितले.

देवरूख - कोकण पदवीधर मतदार संघातील निवडणुकीसाठी रत्नागिरी जिल्ह्यात राष्ट्रवादीला काँग्रेसची गरज नसुन काँग्रेसमधील कुणालाही या प्रक्रियेत विश्‍वासात घेतले जात नसल्याचा आरोप जिल्हा प्रवक्ता अशोक जाधव यांनी केला. या प्रकाराने काँग्रेस कार्यकर्ते संतापले असून आम्ही ऐनवेळी वेगळा निर्णय घेण्यास सक्षम असल्याचे त्यांनी सांगितले.

कोकण पदवीधर मतदारसंघासाठी 25 जुनला मतदान होत आहे. निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासून ते प्रचाराच्या अंतिम टप्पा सुरू झाला तरी जिल्ह्यातील काँग्रेसच्या एकाही सक्षम पदाधिकार्‍याला राष्ट्रवादीने विश्‍वासात घेतलेले नाही. मुळात वरिष्ठ पातळीवरून आघाडी जाहीर झाली असतानाही स्थानिक पातळीवर कुणालाच विचारात न घेणे म्हणजे राष्ट्रवादी आपल्याच पायावर धोंडा मारत असल्याची टीका जाधव यांनी केली.

संपूर्ण मतदारसंघात काँग्रेसची निष्ठावान मते अद्यापही टिकून आहेत. मागील निवडणुकीत आम्ही प्रामाणिक मदत केली होती, म्हणून राष्ट्रवादीचा आमदार निवडून आला होता. यावेळी राष्ट्रवादीला हवेत आहे. त्यामुळे बेरीज वजाबाकीच्या जमान्यात राष्ट्रवादीने काँग्रेसवर फुली मारल्याचे निश्‍चित झाले आहे. आजतागायत काँग्रेसच्या कोणत्याही पदाधिकार्‍याजवळ राष्ट्रवादीने आपली मतदार यादी दिलेली नाही. राष्ट्रवादीचे काहीजण वेगळ्याच उमेदवाराचा प्रचार करीत असल्याची चर्चा आहे, तर काँग्रेसला विश्‍वासात न घेतल्याने काँग्रेस प्रचारापासून अलिप्त असल्याचे त्यांनी सांगितले. आमच्या मतदारांची किंमत नसेल तर आम्हीही वेगळा निर्णय घेऊन आमची ताकद दाखवून देऊ, असा इशारा त्यांनी दिला आहे.

कोकण पदवीधर मतदारसंघ हा कुणाची जहागिरी नाही हे निकालानंतर स्पष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. आगामी विधानसभा लोकसभा निवडणुका आघाडी करून लढण्याचे वरिष्ठ पातळीवर ठरत आहे. मात्र स्थानिक पातळीवर राष्ट्रवादीला आमची किंमत नसल्याचे दिसत आहे. आमची किंमत काय आहे हे याच निवडणुकीत दिसून येईल असे सांगतानाच काँग्रेसची गरज नसेल तर राष्ट्रवादीने तसे जाहीर करावे असे आव्हान त्यांनी दिले.

राष्ट्रवादीतच एकी नाही

राष्ट्रवादीने आपला उमेदवार रिंगणात उतरवला असला तरी राष्ट्रवादीचे काहीजण वेगळेच डाव खरे करण्यासाठी प्रयत्न करीत असल्याची कुजबुज आहे. यामुळे राष्ट्रवादीतच एकी नसून काँग्रेसला का विश्‍वासात घेतले जात नाही याचे उत्तरही त्यांचे डाव खरे झाल्यानंतरच मिळेल अशी कोपरखळी जाधव यांनी मारली.

 

Web Title: Ratnagiri News Ashok Jadhav comment