रत्नागिरीत व्यापाऱ्यावर सुऱ्याने पाच वार 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

रत्नागिरी - शहरातील धनजी नाका या गजबजलेल्या बाजारपेठेत आज कांदे-बटाटे विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यावर सुऱ्याने पाच वार करण्यात आले. सायंकाळी सव्वापाच वाजता हा प्रकार घडला. व्यापारी गंभीर जखमी झाला.

रत्नागिरी - शहरातील धनजी नाका या गजबजलेल्या बाजारपेठेत आज कांदे-बटाटे विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यावर सुऱ्याने पाच वार करण्यात आले. सायंकाळी सव्वापाच वाजता हा प्रकार घडला. व्यापारी गंभीर जखमी झाला. उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. शहर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. या घटनेने बाजारपेठेत दहशतीचे वातावरण आहे. हल्ल्याचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. 

कमलेश संतोष कदम (वय 23, रा. साईसुनंदा अपार्टमेंट- शांतिनगर) हा तरुण व्यापारी हल्ल्यात गंभीर जखमी झाला. या प्रकरणी शुक्रान अनिस हकीम (24, रा. बेलबाग) संशयित असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

शहरातील धनजी नाका ही मोठी बाजारपेठ आहे. दोन्ही बाजूला मोठ-मोठ्या व्यापाऱ्यांची दुकाने आहेत. कमलेश कदम याचेही धनजी नाका येथे अगदी नाक्‍यावर कांदा-बटाट्याचे दुकान आहे. सायंकाळी अचानक दुकानावर कमलेश कदम आणि शुक्रान हकमी यांच्यात वाद झाला. हा वाद एवढ्या टोकाला गेला की, हकीमने धारदार सुरा घेऊन कमलेशवर प्राणघातक हल्ला केला. त्याने कमलेशच्या डोक्‍यावर, मानेवर, हातावर तसेच शरीरावर असे पाच वार केले. यात कमलेश रक्तबंबाळ झाला. दोघांच्या झटापटीमुळे त्या दुकानात ठिकठिकाणी रक्ताचे शिंतोडे उडाले होते. कांदा, बटाट्यावर रक्त सांडले होते. हल्ल्यानंतर शुक्रान हत्यार घेऊन थेट शहर पोलिस ठाण्यात गेला, तर जखमी कमलेश रिक्षातून उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात गेला. यामुळे काहीवेळ परिसरातील सर्व व्यवहार थांबले होते. 

धनजी नाका येथील हा हल्ल्याचा प्रकार आर्थिक व्यवहारातून झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आले आहे. शुक्रान हकीम कमलेशकडे पैसे मागत होता. पैसे देण्यास नकार दिल्यामुळे त्याने हल्ला केल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. ल्यूडो गेमवरूनही त्यांच्यात वाद झाल्याची चर्चा आहे. 

Web Title: Ratnagiri News attack on Businessman