रत्नागिरीत खाडी क्षेत्रात केरळच्याधर्तीवर टुरिझम

मकरंद पटवर्धन
मंगळवार, 23 जानेवारी 2018

रत्नागिरी - केरळच्या धर्तीवर खाडीक्षेत्रामध्ये कर्ला येथून सोमेश्‍वर, चिंचखरीपर्यंत बॅकवॉटर टुरिझमला प्रोत्साहन देण्यासाठी येथील तरुणांनी बोटिंगचा उपक्रम सुरू केला आहे. ​

रत्नागिरी - केरळच्या धर्तीवर खाडीक्षेत्रामध्ये कर्ला येथून सोमेश्‍वर, चिंचखरीपर्यंत बॅकवॉटर टुरिझमला प्रोत्साहन देण्यासाठी येथील तरुणांनी बोटिंगचा उपक्रम सुरू केला आहे.

नारळ, पोफळीच्या बागा, खारफुटीची वने व छोटी छोटी बेटं, जुवे व चिंचखरी येथील दत्त मंदिर, शिंपल्यांपासून चुना कारखाना यासह अनेकविध पक्षी, मच्छीमारांची किनाऱ्यावरील घरे, जाळे टाकून केली जाणारी मासेमारी आदींची सफर बोटीतून करता येणार आहे. अतिशय स्वच्छ असलेल्या या खाडीमध्ये येत्या 26 जानेवारीपासून हा उपक्रम सुरू होईल. रत्नागिरीचे पर्यटन वाढण्याकरिता याचा नक्कीच उपयोग होणार आहे.

येथील राज घाडीगावकर, प्रशांत परब आणि सचिन देसाई यांनी एकत्र येऊन बोटिंग सुरू केले आहे. काजळी नदी भाट्ये येथे समुद्राला मिळते. भाट्येपासून आत सोमेश्‍वरपर्यंतच्या बॅकवॉटरमध्ये बोटिंग करण्याचा प्रयोग गतवर्षी पर्यटन महोत्सवात केला होता. त्याला पर्यटकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. हा उपक्रम पुन्हा सुरू करण्याकरिता दोन बोटी सज्ज करण्यात आल्या.

बोटिंगसाठी अनेक पर्यटक केरळला पसंती देतात. पण त्याहीपेक्षा रत्नागिरी येथील बोटिंग सफरीमध्ये पर्यटनाचा खरा आनंद मिळू शकतो,

- राज घाडीगावकर

पर्यटकांसाठी तीन प्रकारची पॅकेज

  • थिबा पॅलेस पॉईंटवरून दिसणाऱ्या फेरी मारणे
  • जुवे बेट व दत्त मंदिर दर्शन आणि शिंपल्यांपासून चुना बनवण्याचा कारखाना
  • सोमेश्‍वरपर्यंत सफर. चिंचखरीचे दत्त मंदिर.

या सर्व ठिकाणी जेट्टी आहेत. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी लाईफ जॅकेटची व्यवस्था केली आहे. बोटीत पर्यटकांना माहिती देण्याकरिता ऑडिओ तयार करण्यात आला आहे. सायंकाळच्या वेळी सफरीवर गेल्यास बेटांमधील अनेकविध पक्षी आणि सूर्यास्ताचे विलोभनीय दृश्‍य पाहता येईल. खाडीच्या दुतर्फा असणारी मच्छीमारांची कौलारू घरे आणि खाडीत उभ्या असलेल्या छोट्या होड्या पाहण्याचा आनंदही घेता येतो.

खारफुटीचे सौंदर्य

बोटिंग सफारीत कोकणातील विलोभनीय सृष्टीसौंदर्य पाहण्याची संधी मिळते. किनाऱ्यांचे संरक्षण करणाऱ्या खारफुटीचे अनेकविध प्रकार सोमेश्‍वर, चिंचखरी परिसरात पाहायला मिळतात. तसेच बगळे, घार, चिमण्या, खंड्या, कावळा, कबूतर यासह असंख्य प्रकारचे पक्षी पाहण्याची संधी मिळते. 

Web Title: Ratnagiri News Backwater tourism project