भैरी शिमगोत्सवः बारा वाड्यांतील ग्रामस्थांच्या एकीतून उभी राहिली होळी

मकरंद पटवर्धन
शुक्रवार, 2 मार्च 2018

रत्नागिरी - बारा वाड्यांचे ग्रामदैवत श्री देव भैरीबुवाची सुरमाडाची होळी आज अपूर्व उत्साहत उभी करण्यात आली. समस्त हिंदू बांधवांनी एकत्र येऊन धुळवड साजरी करत होळी उभी केली. ढोल-ताशांचा गजर आणि भैरीच्या नावाचा गजर करत दुपारी होळी उभी केली.

रत्नागिरी - बारा वाड्यांचे ग्रामदैवत श्री देव भैरीबुवाची सुरमाडाची होळी आज अपूर्व उत्साहत उभी करण्यात आली. समस्त हिंदू बांधवांनी एकत्र येऊन धुळवड साजरी करत होळी उभी केली. ढोल-ताशांचा गजर आणि भैरीच्या नावाचा गजर करत दुपारी होळी उभी केली.

दरवर्षी भैरीबुवाचा शिमगोत्सव हा थाटामाटात साजरा होतो. या उत्सवात भैरीबुवाची पालखी नेमून दिलेल्या प्रत्येक ठिकाणी ग्रामप्रदक्षिणा करते. वाडीमध्ये मंडप, रांगोळ्या, पताकांनी रस्ते सजले आहेत. आज दुपारी भैरीची पालखी मुरुगवाडा घसरवाट येथे राजेंद्र महादेव सुर्वे यांच्या कंपाऊंडमध्ये होळी घेण्यासाठी नेण्यात आली. तिथे पूजा, गाऱ्हाणे असे विधी करून सुरमाडाची सुमारे पन्नास ते साठ फुटांची होळी घेण्यात आली.

पालखी व होळी खेळवत दुपारी चारच्या सुमारास सहाणेवर आणण्यात आली. होळी धावत धावतच आणली जाते, हे दृष्य पाहण्यासारखेच होते. ढोल-ताशांच्या गजराने होळी नेणाऱ्या गावकऱ्यांचा हुरूप आणखीनच वाढत गेला. त्यामुळे सहजपणे होळी सहाणेच्या परिसरात दाखल झाली. यामध्ये आबालवृद्धांनी सहभाग घेतला. या वेळी ग्रामस्थ, महिलांची तुफान गर्दी उसळली होती.

मोठमोठे दोरखंड, बांबूच्या मदतीने होळी सहाणेच्या आवारात नेम काढून उभी करण्यात आली. ढोल-ताशांचा गजर आणि भैरी बुवाच्या फाका घालत होळी उभी करण्यात ग्रामस्थांनी एकीचे दर्शन घडवले. साडेचार वाजता होळी उभी करण्यास सुरवात झाली. ढोल-ताशांचा गजर आणि एकी यामुळे अवघ्या पाच मिनीटांतच होळी उभी करण्यात आली. त्यानंतर पुजाऱ्यांनी पालखी व होळी यांची पूजा करून नैवेद्य दाखवला. त्यानंतर होळीजवळ मानाचे विडे मांडून भक्तांनी आणलेले नारळ, तोरणे, नवस वगैरेची गाऱ्हाणी घालण्यात आली.

या वेळी सहाणेवर पालखीतील भैरीबुवाच्या दर्शनासाठी शेकडो भाविकांची गर्दी झाली होती. भैरी देवस्थानचे ट्रस्टचे अध्यक्ष मुन्ना सुर्वे, उपाध्यक्ष राजेंद्र जोशी, विश्‍वस्त मंडळी, गावकरी, गुरव मंडळींनी होळी व उत्सवाचे सुयोग्य व्यवस्थापन केले.

होळीचे मानकरी

भैरीबुवाच्या शिमगोत्सवात शेंड्याचा मान परटवण्याचे चर्मकार बंधू खेडेकरांचा तर बुंध्याचा मान मुरुगवाड्याचा आणि मधल्या भागाला गावातील इतर मंडळींचा मान असतो. त्यानुसार होळी झाडगाव सहाणेजवळ आणली गेली. मानकरी, गावकरी, ट्रस्टी व भाविकांच्या एकोप्याने हा उत्सव उत्साहात साजरा केला जात आहे.

Web Title: Ratnagiri News Bhairi Shimagoushav