जीव टांगणीला; होडीतून हायस्कूलला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 जुलै 2018

दाभोळ - भोपण, पणदेरी, दाभीळ, पांगारी या दापोली तालुक्‍यातील अतिशय दुर्गम भाग असलेल्या खाडीपट्ट्यातील भोपण खाडीवर पुलाची मागणी ५२ वर्षानंतरही दुर्लक्षित आहे.

दाभोळ - भोपण, पणदेरी, दाभीळ, पांगारी या दापोली तालुक्‍यातील अतिशय दुर्गम भाग असलेल्या खाडीपट्ट्यातील भोपण खाडीवर पुलाची मागणी ५२ वर्षानंतरही दुर्लक्षित आहे. आजही येथील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे गिरविण्यासाठी आपला जीव टांगणीला ठेवून पावसाच्या पाण्यातून होडीतून दाभीळ येथील मॉडर्न हायस्कूल गाठावे लागते. 

पंचक्रोशीमधील दाभीळ, पांगारी, भोपण, शिरवणे आणि पणदेरी येथे १९६६ हायस्कूल सुरू झाले. दाभीळ खाडीपलीकडील भोपण-पणदेरीतील विद्यार्थी दाभीळमध्ये येतात. तेव्हापासून भोपण खाडीवरील पुलाची मागणी आहे.जीव धोक्‍यात घालून दररोजच  विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागत आहे. 

दाभीळ खाडीत घडलेल्या दुर्घटनेमुळे पालक होडीतील प्रवासाला घाबरत आहेत. ते पाल्यांना विशेषतः मुलींना घरीच ठेवतात. मुलींचे शिक्षण खंडित होत आहे. मी स्वतः संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसोबत शाळेत विद्यार्थी न पाठवणाऱ्या पालकांशी संपर्क साधून मुलींना शाळेत पाठवा, अशी विनंती करूनही पालकांच्या मनातून खाडीतून प्रवासाची भीती जात नाही.
- अकबर दळवी,
मुख्याध्यापक, मॉडर्न हायस्कूल

मॉडर्न हायस्कूलमध्ये भोपण-पणदेरीतून येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खूप होती. खाडीत दोन वेळा होडी उलटून दुर्घटना घडल्याने पालक घाबरले आहेत. आता पालक मुलांना पाठवत नाहीत. त्यामुळे विद्यार्थी संख्या घटत आहे. 
रामदास कदम आताही मंत्री युतीच्या सरकारच्या काळात या भागाचे आमदार आणि राज्याचे तत्कालीन मंत्री रामदास कदम यांनी या खाडीपुलाला मंजुरी मिळवून दिली होती. 

१९ जून १९९९ ला या पुलाच्या कामाची ७ कोटी रुपयांची निविदाही प्रसिद्ध झाली. मात्र युती सरकार गेल्यावर हा निधी कुठे गेला हे कळले नाही. रामदास कदम आताही मंत्री असल्याने त्यांनी या पुलासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी करण्यात येत आहे.  
 

Web Title: Ratnagiri News Bhopan school students problems