मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणामुळे पक्ष्यांच्या अधिवासास धोका 

मकरंद पटवर्धन
सोमवार, 15 जानेवारी 2018

रत्नागिरी - मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणात अनेक झाडांची कत्तल होणार आहे. यामुळे पक्ष्यांचे भवितव्य धोक्यात येऊ शकते, अशी भीती पक्षीमित्र नयनीश गुढेकर व डॉ. विक्रम घाणेकर यांनी व्यक्त केली आहे.  मात्र, पक्षांना वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची लागवड करता येणे शक्य आहे असा उपायही त्यांनी सुचविला आहे. 

रत्नागिरी - मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणात अनेक झाडांची कत्तल होणार आहे. यामुळे पक्ष्यांचे भवितव्य धोक्यात येऊ शकते, अशी भीती पक्षीमित्र नयनीश गुढेकर व डॉ. विक्रम घाणेकर यांनी व्यक्त केली आहे.  मात्र, पक्षांना वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची लागवड करता येणे शक्य आहे असा उपायही त्यांनी सुचविला आहे.

याकरिता प्रत्येक नागरिकाने योगदान द्यावे व आपल्या घरी किमान पाच झाडांची लागवड करावी. महामार्ग पूर्ण झाल्यानंतर ही झाडे महामार्गालगत लावण्यात यावीत, असे आवाहनही यावेळी पक्षीमित्र गुढेकर व डॉ. घाणेकर यांनी केले.

येथील लेन्स आर्टतर्फे पक्षीनिरीक्षणावर त्यांचे व्याख्यान झाले. दरम्यान आज सकाळी साडेसहा वाजता 48 फोटोग्राफर्सच्या चमूने चंपक मैदान, गुरुमळी आणि काजरघाटीमध्ये पक्षीनिरीक्षण, छायाचित्रण केले. त्यानंतर शर्वाणी हॉलमध्ये व्याख्यान झाले. त्या वेळी पक्ष्यांच्या जाती, त्यांचे अधिवास याबद्दल सविस्तर मार्गदर्शन त्यांनी केले.

पक्षीमित्रांनी केलेल्या सुचना

  • छायाचित्र काढताना पक्षी, प्राण्यांना त्रास होईल, असे वर्तन ठेवू नये.

  • पक्ष्यांच्या घरट्याजवळ जाऊन फोटोग्राफी करण्याचा अतिरेक करू नका.

  • कोकणातील गिधाडे वाचली पाहिजेत.

  • अनेक छोट्या पक्ष्यांची घरटी झुडुपांमध्ये असतात. मात्र फळबाग लागवडीसाठी जंगल जाळले जाते, वणव्यांमुळे या छोट्या पक्ष्यांचे जीवन धोक्यात आले आहे.

  • सुरवातीला पक्ष्यांची पूर्ण माहिती घेतली पाहिजे. कोणता पक्षी कधी, कुठे दिसला याची नोंद ठेवा. पक्ष्यांच्या आवाजावर कोणता पक्षी आहे, ते ओळखायला शिका.

फोटोग्राफी कॅमेरा व दुर्बिण यातील कौशल्ये डॉ. घाणेकर यांनी यावेळी सांगितली. श्रीकांत ढालकर यांनी पक्ष्यांबद्दल मनोरंजक माहिती सांगताना पक्ष्यांचे आवाज हुबेहूब काढून दाखवले. लेन्स आर्टबरोबर पक्षीनिरीक्षण वर्ग घेण्याचा मानस व्यक्त केला.

सुगरण, कर्टुक, मोठा कर्टुक, हळद्या, लालबुड्या बुलबुल, शिंजीर, कंठेरी वटवट्या, सोनपाठी सुतार, कापसी घार, शेषारी, रानकोंबडी, ससाणा, नवरंग, चष्मेवाला, पिंगळा, वेडा राघू, वंचक, बगळा, तिबेटी खंड्या, धनेश, मराल, छोटा किलकिल, साळुंकी, मोहोळ घार, अर्धकंठी चिकल्या, पाचू कवड्या, ब्राह्मणी घार, कुदल्या असे शेकडो प्रकारचे पक्षी या परिसरात आढळतात. प्रत्येकाने आपल्या भागात यांची नोंद ठेवल्यास त्यातून चांगली माहिती संकलित होईल व संशोधन करता येऊ शकते. याकरिता लेन्स आर्ट पुढाकार घेणार आहे.

-  सिद्धेश वैद्य , लेन्स आर्ट

कार्यक्रमासाठी निखिता शिंदे, नेत्रा आपटे, अभिजित बोडस, उपेंद्र बापट, सुशांत सनगरे, गणेश रानडे, अक्षय तोंडवलकर, शुभम पांढरपोटे यांनी मेहनत घेतली.

 

Web Title: Ratnagiri News Bird servery by birdlovers