छत्रपती शिवाजी क्रीडांगण नव्हे; गवताचे कुरण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

रत्नागिरी - रणजी क्रिकेट सामने खेळण्याचा मान मिळालेल्या येथील छत्रपती शिवाजी क्रीडांगण ठेकेदाराच्या भोंगळ आणि मनमानी कारभाराने कुरणच बनले आहे. या क्रीडांगणावर गुडघाभर गवत उगवले आहे. ठेकेदार मात्र याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करत असून छापा फोटो, कोण काय करते ते बघतो, असे सांगत हा ठेकेदार फिरत आहे. काही नेत्यांचा त्याला आशीर्वाद असल्याचे बोलले जात आहे. 

रत्नागिरी - रणजी क्रिकेट सामने खेळण्याचा मान मिळालेल्या येथील छत्रपती शिवाजी क्रीडांगण ठेकेदाराच्या भोंगळ आणि मनमानी कारभाराने कुरणच बनले आहे. या क्रीडांगणावर गुडघाभर गवत उगवले आहे. ठेकेदार मात्र याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करत असून छापा फोटो, कोण काय करते ते बघतो, असे सांगत हा ठेकेदार फिरत आहे. काही नेत्यांचा त्याला आशीर्वाद असल्याचे बोलले जात आहे. 

शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी छत्रपती शिवाजी क्रीडांगण आहे. पालिकेच्या मालकीच्या या क्रीडांगणाच्या देखभाल दुरुस्तीसाठी पालिका ठेकेदार नेमते. त्यासाठी त्याला महिन्याला साधारण ४० हजार रुपये दिले जातात. त्यातून त्याने क्रीडांगणाची निगा राखायची आहे. खेळपट्टी, लॉन, शौचालय आदींची देखभाल करायची आहे. यापूर्वी (कै.) विश्‍वनाथ चव्हाण यांच्याकडे देखभाल दुरुस्तीचा ठेका होता. ते क्रीडाप्रेमी होते. त्यामुळे क्रीडांगणाची कधी दुरवस्था होऊ दिली नाही. उद्योजक किरण सामंत, आमदार उदय सामंत, राजेश सावंत, संदीप तावडे, श्री. मलुष्टे आदी क्रीडाप्रेमींनी क्रीडांगणाचा दर्जा उंचावण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. त्यामुळे छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर पहिला रणजी सामना झाला. 

छत्रपती शिवाजी क्रीडांगणाची आजची परिस्थितीत मात्र फारच विदारक आणि क्रीडाप्रेमींना चीड आणणारी आहे. महिन्याला देखभाल दुरुस्तीला ४० हजार रुपये दिले असूनही संपूर्ण क्रीडांगणावर गुडघाभर गवत उगवले आहे. सरपटणाऱ्या प्राण्यांचा तेथे येणाऱ्या खेळाडू, मॉर्निंग वॉकला येणाऱ्यांना त्रास होत आहे. परंतु ठेकेदाराचे याकडे अजिबात लक्ष नाही.

श्री. पेडणेकरांच्या नावाखाली साळवी नामक व्यक्ती याचा कारभार पाहत आहेत. शिावसेनेचीच सत्ता आहे. सेनेचाच ठेकेदार आहे. त्यामुळे सेनेच्या वरिष्ठ नेत्यांच्या आशीर्वादानेच या ठेकेदाराचे फावले आहे. त्याचा मनमानी कारभार सुरू आहे. पालिका प्रशासनालाच वस्तुस्थिती पाहून कमीपणा वाटला आणि तक्रारी वाढल्याने काही भागातील गवत कापायला घेतले आहे. ठेकेदाराला मात्र याचे काही देणे-घेणे नाही. कुचकामी ठेकेदाराचा ठेका रद्द करून तो कार्यक्षम ठेकेदाराला द्यावा, अशी मागणी होत आहे. पालिका प्रशासन किंवा सत्ताधारी काय निर्णय घेणार याकडेच लक्ष आहे. 

पालिकेत कारवाईसाठी तक्रार - सुदेश मयेकर
आंतरराष्ट्रीय दर्जाचा रणजी सामना झालेले हे छत्रपती शिवाजी क्रीडांगण आहे; परंतु पालिकेचे सत्ताधारी असो वा ठेकेदार यांना याचे काही घेणे-देणे नाही. त्यामुळे देखभाल दुरुस्तीअभावी क्रीडांगणात उंच गवत उगवले आहे. एकाला सर्पदंश झाला आहे. महिन्याला मोबदला देऊनही काम न करणाऱ्या ठेकेदारावर पालिकेची कृपादृष्टी का?. याबाबत आधीच पालिकेत आम्ही तक्रार दिली आहे. तत्काळ सुधारणा किंवा ठेकेदारवर कारवाई न झाल्यास पुढचे पाऊल उचलू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते सुदेश मयेकर यांनी दिला आहे. 

Web Title: Ratnagiri news Chhatrapati Shivaji Playgroud Deterioration