पर्ससिनवरून मच्छीमारांमध्ये पुन्हा संघर्ष

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जानेवारी 2018

रत्नागिरी जिल्हा पर्ससिननेट मच्छीमार संघटना, अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती आणि  रत्नागिरी तालुका पर्ससिननेट मच्छीमार मालक असोसिएशनचा यामध्ये समावेश आहे. दोन्ही पर्ससिननेट संघटनांनी अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीच्या अध्यक्षांवर आरोप करीत २६ तारखेला उपोषण करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.

रत्नागिरी - मासेमारीवरून जिल्ह्यात तीन संघटना आमने-सामने उभ्या ठाकल्या आहेत. रत्नागिरी जिल्हा पर्ससिननेट मच्छीमार संघटना, अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती आणि  रत्नागिरी तालुका पर्ससिननेट मच्छीमार मालक असोसिएशनचा यामध्ये समावेश आहे. दोन्ही पर्ससिननेट संघटनांनी अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीच्या अध्यक्षांवर आरोप करीत २६ तारखेला उपोषण करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. तसेच कृती समितीच्या अध्यक्षांनी उपोषण करण्याचा इशारा दिला. 

मासेमारी व्यवसायाशी प्रत्यक्ष संबंध नसणाऱ्या काही स्वयंघोषित नेत्यांनी संस्था व अन्य संघटनांची कार्यालये थाटली आहेत. या नेत्यांसह त्यांच्या संस्था कार्यालयातील कार्यपद्धतीची चौकशी करावी, अशी मागणी जिल्हा पर्ससिननेट मच्छीमार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन निवेदन दिले.

रत्नागिरी तालुका पर्ससिननेट मच्छीमार मालक असोसिएशनने देखील आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. ट्रॉलिंग, बुल ट्रॉलिंग आदी मच्छीमारी नियमबाह्य सुरू आहे. किनाऱ्यावरील मच्छीसाठे त्यामुळे नष्ट होत आहेत. त्यांचे विरोधात २६ जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल, असे म्हटले आहे.

असोसिएशनचे अध्यक्ष विकास सावंत, नासिर वाघू, जावेद होडेकर, किशोर नार्वेकर, पुष्कर भुते, मुनाफ होडेकर, जितेंद्र बिर्जे, ओमकार मोर, श्री. भोंगले, श्री. मोंडकर आदींनी 
हे निवेदन दिले. 

राज्य व केंद्र शासनाच्या आदेशाची पायमल्ली करून मत्स्य व्यवसाय खात्याच्या आशिर्वादाने पर्ससिन मासेमारी सुरू आहे. या मासेमारीविरोधात २६ जानेवारीला उपोषण करण्याचे आणखी एक निवेदन अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समित खलिल वस्ता यांनी दिले. अशा तऱ्हेने तीन संघटना एकमेकाविरोधात उभ्या ठाकल्याने मच्छीमारांध्ये संघर्ष होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. 

पर्ससिननेट मच्छीमार संघटनेचे पदाधिकारी सुलेमान मुल्ला, नुरुद्दिन पटेल, नगरसेवक सुहेल साखरकर, प्रतिक मोंडकर, आदिल म्हसकर, मेहबूब फडनाईक, मकसूद शेट यांच्या नेतृत्वाखाली मच्छीमारांनी ही कैफियत मांडली.

मासळी व्यवसायात नसलेले पुढारी संस्था स्थापन करून विधायक कार्य करण्याऐवजी मोठी आर्थिक गुंतवणूक करणाऱ्या मच्छीमारांना अडचणीत आणून खंडणी वसुलीसाठी कटकारस्थाने होत असल्याचा संशयही निवेदनात व्यक्त करण्यात आला आहे.

Web Title: Ratnagiri News Conflict Against Fishermen from Persecin