गिधाड संवर्धन मोहिमेला खो

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 मे 2018

कोकणात गिधाड सर्वेक्षण, संरक्षण आणि संवर्धन करणे, त्यासाठीची पूरक वातावरणनिर्मिती आणि डायक्‍लोफेनॅक बंदी अंमलबजावणीच्या दृष्टीने वन विभाग काम करीत आहे.

चिपळूण - नामशेष होणाऱ्या गिधाडांच्या संवर्धनासाठी उपाहारगृहांची योजना सुरू झाली. मात्र, खाद्याची कमतरता आणि जागेच्या अडचणीमुळे ही मोहीम धोक्‍यात आली आहे. सुकोंडी (दापोली), विहाळी (खेड) येथे गिधाडांसाठी सुरू केलेली उपाहारगृहे (व्हर्ल्चर रेस्टॉरंट) बंद पडली. कळकवणे (मंडणगड) येथील उपाहारगृह खाद्याअभावी बंद पडण्याच्या मार्गावर आहे. 
कोकणात गिधाड सर्वेक्षण, संरक्षण आणि संवर्धन करणे, त्यासाठीची पूरक वातावरणनिर्मिती आणि डायक्‍लोफेनॅक बंदी अंमलबजावणीच्या दृष्टीने वन विभाग काम करीत आहे.

जिल्ह्यात अनेक भागांत गिधाडांचा वावर होता. १९९० पासून त्यांच्या संख्येत घट झाली. त्यानंतर कोकणचे शास्त्रीयदृष्ट्या सर्वेक्षण करून त्यांच्या वास्तव्याची ठिकाणे, एकूण वसाहती, खाद्याची ठिकाणे यांचा अभ्यास झाला. २००२ मध्ये आंजर्ले येथे पांढऱ्या पाठीच्या गिधाडांची घरटी आणि पक्षी आढळले. तेथून गिधाड संवर्धनाला सुरवात झाली.

२००६ पर्यंत जिल्ह्यात ७ घरटी आणि १४ पक्ष्यांची वाढ दिसली. नंतर श्रीवर्धन व चिरगांव येथे वसाहती आढळल्या होत्या. यापूर्वी कोकणात यापेक्षाही अधिक गिधाडांच्या वसाहती आढळल्या. मात्र जनावरांना झालेली बोटूलिझमची लागण, स्वच्छता अभियानात चकाचक झालेला परिसर, मृत जनावरे जमिनीत पुरण्याचे वाढलेले प्रमाण यामुळे खाद्याअभावी गिधाडांच्या संख्येला ब्रेक लागला. उपाहारगृहामध्ये गिधाडांसाठी मृत जनावरे खाद्य म्हणून येऊन पडणे बंद झाले आहेत. सुकोंडी येथे जागेचा वाद आहे. विहाळी येथे खाद्याचा तुटवडा आहे.  

गिधाड संवर्धनासाठी शासनाकडून निधी मिळवणे व पर्यायी जागेची निवड करून या प्रकल्पाला चालना देण्यासाठी वन विभागाचे प्रयत्न सुरू आहेत.
- विकास जगताप,

 विभागीय वनाधिकारी

गिधाडांचे प्रकार

  • संपूर्ण पांढरा 
  • पांढऱ्या पाठीचा
  • लांब चोचीचा
     
Web Title: Ratnagiri News conservation of gidhad