​रत्नागिरी जिल्ह्यातील गावखडीत कासवांचे संवर्धन 

मकरंद पटवर्धन/सुधीर विश्‍वासराव
मंगळवार, 20 मार्च 2018

गावखडी -  रत्नागिरी तालुक्यातील गावखडी समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले कासवाची सुमारे 35 पिल्ले समुद्रात झेपावली. दुडूदुडू चालणारी, दमल्यावर थोडा वेळ थांबणारी आणि समुद्राच्या लाटांची गाज ऐकून त्या दिशेने कूच करणारी इवली इवली पिल्ले पाहून पर्यटकांच्या चेहेर्‍यावर हास्य उमटले. काल (ता. 19) सूर्यास्तानंतर निसर्गाचा हा अद्वितीय चमत्कार आणि अद्भुत सोहळा झाला.

गावखडी -  रत्नागिरी तालुक्यातील गावखडी समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले कासवाची सुमारे 35 पिल्ले समुद्रात झेपावली. दुडूदुडू चालणारी, दमल्यावर थोडा वेळ थांबणारी आणि समुद्राच्या लाटांची गाज ऐकून त्या दिशेने कूच करणारी इवली इवली पिल्ले पाहून पर्यटकांच्या चेहेर्‍यावर हास्य उमटले. काल (ता. 19) सूर्यास्तानंतर निसर्गाचा हा अद्वितीय चमत्कार आणि अद्भुत सोहळा झाला.

निसर्गयात्री संस्थेचे कार्यकर्ते प्रदीप डिंगणकर, सुधीर रिसबूड, धनंजय मराठे, वन विभाग, गावखडी ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या प्रयत्नांमुळे कासव बचाव मोहीम यशस्वी होत आहे.

प्रदीप डिंगणकर यांनी सांगितले की, नोव्हेंबर 2017 पासून कासव अंडी घालायला येत आहेत. सुरक्षा रक्षक राकेश पाटील व मी नियमित गस्त घालून, जिथे कासवांनी अंडी घातली आहेत तिथून ती वन विभागाच्या मदतीने कृत्रिम हॅचरीमध्ये ठेवली. कासवांना सर्वांत मोठा धोका माणसाचा असल्याने त्यांच्यापासून बचाव करावा लागतो. यासाठी हॅचरी बनवली आहे. 50-55 दिवसांत अंड्यातून पिल्ले बाहेर येतात. ही पिल्ले समुद्रात सोडली जातात. हे काम एप्रिल-मेपर्यंत सुरू राहील. किनारपट्टीवरील प्रत्येक ग्रामस्थांनी जबाबदारी ओळखून हातभार लावला पाहिजे. कोकण किनारपट्टीवर अनेक ठिकाणी कासवं अंडी घालतात. त्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. 

निसर्गयात्रीचे संस्थापक सुधीर रिसबूड म्हणाले, आम्ही चार-पाच वर्ष या किनार्‍यावर लक्ष ठेवून होतो. कासव भरपूर येतात पण अंडी मिळत नाहीत. माणसांपासून मोठा धोका निर्माण झाला. परंतु डिंगणकर व पाटील यांनी अहोरात्र मेहनत घेऊन सर्व ट्रॅक शोधून गतवर्षी 835 पिल्ले समुद्रात झेपावली. शेवटचे पिल्लू समुद्रात झेपावेपर्यंत त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. यंदा 9 घरटी झाली असून त्यातील 150 पिल्ले समुद्रात झेपावली आहेत. खरं तर कासवांचे संवर्धन ही काळाची गरज आहे. त्याला पर्यटनाची जोड मिळाली तर उपयोग होईल. त्यातून रोजगारसंधीही उपलब्ध होती.

वेत्ये, गणेशगुळे येथील किनार्‍यावरही येतात. यासाठी सर्व ग्रामस्थांचे सहकार्य मिळावे. शासनाचे सहकार्य मिळत गेले तर कोकण विकास नक्कीच साधता येईल.

वेळासप्रमाणे कासव महोत्सव 

वेळास (ता. मंडणगड) येथे अनेक वर्षे कासव महोत्सव साजरा होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील असा दुसरा महोत्सव गावखडी येथे भरवण्याचा मानस असल्याचे निसर्गयात्रीतर्फे सांगण्यात आले. याकरिता वन विभाग, पोलिस, जिल्हा प्रशासनाचे सहकार्य आवश्यक असून या माध्यमातून पर्यटनाला गती देणे शक्य आहे. या महोत्सवासाठी आलेल्या पर्यटकांना याच परिसरातील कातळशिल्पे पाहण्याची पर्वणीही मिळू शकते.

 

Web Title: Ratnagiri News conservation of turtles in Gavkhadi