देवरूख हायस्कूलच्या शिक्षकाने फुलवला शेतीचा मळा

देवरूख हायस्कूलच्या शिक्षकाने फुलवला शेतीचा मळा

देवरूख - नोकरी करतानाही शेतीची आवड असेल, तर एखादा शिक्षकही मळा बहरवू शकतो. यातून भाज्यांच्या बाबतीत स्वयंपूर्ण होतानाच आर्थिक उत्पन्नही कमावू शकतो हे सिध्द केले आहे, देवधामापूर येथील रहिवासी आणि देवरूख हायस्कूलचे शिक्षक राहुल सप्रे यांनी. ते १० वर्षे सातत्याने नवनवीन उत्पादने घेत आहेत. गेली दोन वर्षे कोबीची यशस्वी लागवड केली. 

गेल्यावर्षीपासून त्यांनी कोबीचे उत्पादन घ्यायला सुरवात केली आहे. यासाठी कोबीचे संकरित बियाणे वापरले आहे. गतवर्षी १ हजार कोबीचे कांदे मिळाले यावर्षी हीच संख्या १५०० च्या घरात जाणार आहे. जोडीला यावर्षी भुईमुगाचीही लागवड त्यांनी केली आहे. यासाठी बाँबे ५५ जात वापरण्यात आली आहे. कोबी आणि भुईमुगाच्या जोडीला यावर्षी कुळीथ, तुर, वांगी, चवळी, मका, कोथींबीर यांचीही लागवड करण्यात आली आहे. 

देवधामापूर-सप्रेवाडीत राहाणारे राहुल रमेश सप्रे हे न्यू इंग्लिश स्कूल देवरूखमध्ये शिक्षक. शेतीची आवड असल्याने त्यांनी १० वर्षापूर्वी  घराशेजारच्या २५ गुंठे जमिनीत भाजीपाला उत्पादनाला सुरवात केली. मिरची, वांगी, भेंडा, तूर असे करीत सुरवात झालेले भाजीपाल्याचे उत्पादन यावर्षीही सुरूच आहे. या कामात त्यांना त्यांचे भाऊ सतीश आणि दत्तात्रय यांचीही साथ लाभते.

संध्याकाळी आणि सकाळी लवकर परसावात भाजीपाल्याचे काम करतात. भाजीपाला उत्पादन पूर्णतः सेंद्रिय असावा, यासाठी त्यांनी आवारातच गांडूळ खत प्रकल्प उभारला आहे. शिवाय शेणखताचाही मोठ्या प्रमाणात वापर करतात. पाण्याचा योग्य वापर व्हावा यासाठी ४ वर्षांपूर्वी त्यांनी ठिबक सिंचनचा वापर सुरू केला. यावर्षीपासून त्यांनी शेतात तुषार सिंचन सुरू केले आहे. यातून पिकांना योग्य प्रमाणात पाणी मिळते. शिवाय पाण्यासाठी वेगळ्या माणसाची गरज लागत नाही.  मिळणाऱ्या उत्पादनातून घरासाठी मुबलक भाजी तर मिळतेच शिवाय त्याची विक्री करून चांगले उत्पन्नही मिळू शकते हेच सप्रे यांनी सिद्ध केले आहे. यासाठी केवळ आवड आणि कष्ट करण्याची तयारी हवी असे ते सांगतात. दोन वर्षांपूर्वी त्यांनी कलिंगडाचे उत्पादन घेतले होते तर यापूर्वी टोमॅटो, दोडका, पडवळ, चिबूड यांचेही यशस्वी उत्पादन त्यांनी घेतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com