काँग्रेस-राष्ट्रवादीची देवरूख निवडणूकीत आघाडी

संदेश सप्रे
मंगळवार, 6 मार्च 2018

देवरूख - नगरपंचायत निवडणुकीची धुळवड सुरू झाली असतानाच शिवसेना आणि भाजपला शह देण्यासाठी देवरुखात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी निश्‍चित झाली आहे.

देवरूख - नगरपंचायत निवडणुकीची धुळवड सुरू झाली असतानाच शिवसेना आणि भाजपला शह देण्यासाठी देवरुखात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी निश्‍चित झाली आहे. नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीकडून स्मिता संतोष लाड यांचे नाव निश्‍चित असून दोन दिवसांत याची घोषणा होणार आहे.

आघाडीत सध्या जागा वाटपासाठी बैठका सुरू झाल्या आहेत. 
या आघाडीत राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या बरोबरीनेच जनता दल आणि आरपीआयचा एक गटही असण्याची शक्‍यता आहे. त्यादृष्टीने जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरविण्यासाठी याआधीच चार बैठका घेण्यात आल्या. सर्वाधिक जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला येणार असून त्यानंतर कॉंग्रेस आणि इतर मित्र पक्षांना जागावाटप केले जाणार आहे. दोन्ही पक्षांनी आपले उमेदवारही निश्‍चित केले आहेत. उमेदवारांच्या ताकदीनुसार समजुतीने जागा वाटप होत असल्याने आघाडी सेना-भाजपला टक्‍कर देणार हे निश्‍चित झाले आहे. 

नगराध्यक्षपदासाठी आघाडीकडून एकमुखाने स्मिता संतोष लाड यांचे नाव निश्‍चित करण्यात आल्याचे सांगण्यात आले. सौ. लाड याआधी पंचायत समिती सदस्य होत्या. त्यांना सभापतिपदाचा अनुभव आहे. गेली पाच वर्षे त्या नगरसेविका आहेत. प्रशासनाचा दांडगा अनुभव, चांगला जनसंपर्क आणि राजकीय हुशारी यामुळे सौ. लाड या पदासाठीच्या तगड्या उमेदवार ठरणार आहेत. 

मागीलवेळी जागा वाटपात एकमत न झाल्याने पहिली निवडणूक कॉंग्रेस व राष्ट्रवादीने स्वतंत्रपणे लढवली होती. 17 पैकी केवळ एकाच जागेवर ऐनवेळी आघाडी झाली होती. स्वतंत्र लढण्याचा फटका दोन्ही पक्षांना बसला आणि दोघांचेही केवळ 5 सदस्य निवडून आले होते. यामुळे यावेळी शहाणे होत कॉंग्रेस राष्ट्रवादीने मित्रपक्षांसह एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. जागा वाटप निश्‍चित झाल्यानंतर आघाडीसह नगराध्यक्षपदाची अधिकृत घोषणा होणार असल्याचे दोन्ही पक्षांकडून सांगण्यात आले. 

देवरूखच्या रणांगणात शिवसेना, भाजप, महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्वतंत्रपणे रिंगणात उतरणार आहेत, तर कॉंग्रेस आघाडीही मैदानात असल्याने देवरूखातील लढत ही चौरंगी होणार हे स्पष्ट झाले आहे. 

जनता दलाकडून आर्ते रिंगणात 
कॉंग्रेस आघाडीला जनता दलाचीही साथ मिळणार आहे. जनता दलाचे जिल्हाध्यक्ष युयुत्सु आर्ते निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संस्थांचे पदाधिकारी म्हणून आर्ते यांची ओळख आहे. गतवेळी त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. यावेळी त्यांना आघाडीची साथ मिळणार आहे. 

Web Title: Ratnagiri News Devrukh Nagarpanchyat election