देवरुखात माने-बनेंची प्रतिष्ठा पणाला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 मार्च 2018

देवरूख - येथील नगरपंचायतीच्या निवडणुकीत एकेकाळचे पक्‍के राजकारणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माजी आमदार रवींद्र माने आणि सुभाष बनेंचीही प्रतिष्ठा देवरुखात पणाला लागणार आहे. हे दोघेही शिवसेनेत परतल्याने त्यांच्या ज्येष्ठत्वाची येथे कसोटी असून त्यांच्या अनुभवाचा शिवसेना कसा फायदा करून घेते हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे.

देवरूख - येथील नगरपंचायतीच्या निवडणुकीत एकेकाळचे पक्‍के राजकारणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माजी आमदार रवींद्र माने आणि सुभाष बनेंचीही प्रतिष्ठा देवरुखात पणाला लागणार आहे. हे दोघेही शिवसेनेत परतल्याने त्यांच्या ज्येष्ठत्वाची येथे कसोटी असून त्यांच्या अनुभवाचा शिवसेना कसा फायदा करून घेते हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे.
२००४ ला शिवसेनेचे आमदार झालेले सुभाष बने एका राजकीय वादळात २००६ ला काँग्रेसमध्ये गेले. तिथेही ते आमदार झाले. ९ वर्षांनंतर काँग्रेसची पद्धत न रुचल्याने २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ते पुन्हा शिवसेनेत परतले.

तेव्हापासून बने हे ज्येष्ठ नेते म्हणून शिवसेनेत वावरत आहेत. त्यांचा पुत्र रोहन हे जिल्हा परिषद सदस्य आहे. सलग तीन वेळा आमदार आणि एकवेळा राज्यमंत्री असलेले रवींद्र माने अंतर्गत कलहामुळे २०१० ला शिवसेना सोडून राष्ट्रवादीवासी झाले. गेली ७ वर्षे त्यांनी राष्ट्रवादीसाठी निष्ठेने काम केले. मात्र त्यांच्या पदरी निराशाच पडली. अखेर गेल्याचवर्षी ते शिवसेनेत पुन्हा दाखल झाले. आता त्यांच्यावरही ज्येष्ठ नेते म्हणून सेनेची मोठी जबाबदारी आहे. आताच्या निर्णयप्रक्रियेत त्यांनाही मानाचे स्थान मिळत आहे.

नगरपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत देवरूखची जबाबदारी आमदार सदानंद चव्हाण, जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, तालुकाप्रमुख प्रमोद पवार यांच्यावर असली तरी ज्येष्ठ या नात्याने माने आणि बनेंनाही येथे रणांगणात उतरण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. मित्रपक्ष भाजपने सोडलेली साथ यामुळे संख्याबळ जास्त असतानाही गमवावी लागलेली सत्ता, सद्यस्थितीत भाजपसह काँग्रेस आघाडीने उभे केलेले आव्हान या सर्वांना तोंड देण्यासाठी शिवसेनेला या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांची मदत घ्यावीच लागणार आहे. यावेळी थेट नगराध्यक्षपद असल्याने शिवसेनेचा नगराध्यक्ष येथे निवडून येण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे माने-बनेंची प्रतिष्ठाही देवरुखात पणाला लागणार हे निश्‍चित आहे.

तालुक्‍याच्या राजकारणात १९९० ते ९९ पर्यंत माने बने एकत्र होते. त्यानंतर २००४ ते २००६ पर्यंतही ते एकाच पक्षात होते. त्यानंतरच्या काळात वेगळी झालेली ही राजकीय जोडगोळी या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकाच वाटेवर आली आहे. प्रदीर्घ कालावधीनंतर दोन मुरब्बी राजकारणी एकत्र आल्याने देवरूखच्या सारीपाटावर ते कोणता डाव खेळतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Web Title: Ratnagiri News Devrukh Nagarpanchyat election