प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मिळवले 92 टक्के

सचिन माळी
मंगळवार, 12 जून 2018

मंडणगड - काहीजणं परिस्थिती अनुकूल असूनही तक्रारींचा पाढा वाचतात. मात्र काहीजण प्रतिकूल परिस्थितीवर मात करत कौतुकास्पद यश मिळवतात. तालुक्यातील केरीळ येथील दिक्षा दिनेश पवारची कहाणीही अशीच प्रेरणा देणारी आहे. परिस्थितीवर मात्र करत तिने दहावीत 92 टक्के गुण मिळवले.

मंडणगड - काहीजणं परिस्थिती अनुकूल असूनही तक्रारींचा पाढा वाचतात. मात्र काहीजण प्रतिकूल परिस्थितीवर मात करत कौतुकास्पद यश मिळवतात. तालुक्यातील केरीळ येथील दिक्षा दिनेश पवारची कहाणीही अशीच प्रेरणा देणारी आहे. परिस्थितीवर मात्र करत तिने दहावीत 92 टक्के गुण मिळवले.

देव्हारे पंचक्रोशी हायस्कूलमध्ये दिक्षा शिक्षण घ्यायची. घरची परिस्थिती प्रतिकूल होती. पाच वर्षांपूर्वी वडिलांचे निधन झाले. घरचा सर्व भार आईवर आला. दिक्षाची आई दक्षना यांनी इतरांच्या घरात पाणी भरले, मजुरी करून घरखर्च भागवला. आईचे कष्ट पाहून दिक्षाने घरकामात मदत करत अभ्यास केला. घरापासून शाळा चार किमी अंतरावर. रोज रानातून पायवाटेने जावे लागायचे. रोजचा 8 किमीचा प्रवासही दीक्षाने सत्कारणी लावला. पायवाटेने जाताना प्रश्नोत्तरे पाठ करायची. कोणताही क्लास न लावता तीने घरची कामे करून स्वतःच सात तास अभ्यास केला. मुलीच्या यशाने आई दक्षना, बहीण दीपिका, रिया यांना आकाश ठेंगणे झालं आहे. गणितात तिला 95, तर विज्ञानात 90 गुण मिळाले आहेत. दहावीत चांगले गुण मिळवून काही होणार नाही, याची दिक्षाला कल्पना आहे. त्यामुळे पुढे वाणिज्य शाखेत प्रवेश घेण्याची तिची इच्छा आहे. 

पुस्तकांसाठी काम करून मिळवले चार हजार

प्रथम वर्षाचा शैक्षणिक भार आईवर पडू नये म्हणून मिळालेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत काम करून दीक्षाने चार हजार रुपये जमा केले. त्यातून ती पुस्तके खरेदी करणार असल्याचे ‘सकाळ’ला सांगताना तिच्या आईचा कंठ अभिमानाने दाटून आला.

“कौटुंबिक परिस्थितीमुळे मुलींच्या पुढील शिक्षणासाठी अडचणी येत आहेत. दीक्षा खूप मेहनती असून पुढे शिक्षण घ्यायची मनस्वी इच्छा आहे. तिच्या यशामुळे माझाही उत्साह दुणावला आहे.”

- दक्षना पवार, दीक्षाची आई

Web Title: Ratnagiri News Diksha Pawar success story