डिंगणी-जयगड रेल्वे मार्गात अडथळे सुरू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

देवरूख - प्रस्तावित डिंगणी-जयगड रेल्वे मार्गाचे काम वेगात सुरू असले तरीही प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या मान्य न झाल्याने संघर्ष कृती समिती पुन्हा आंदोलनाच्या तयारीत आहे.

देवरूख - प्रस्तावित डिंगणी-जयगड रेल्वे मार्गाचे काम वेगात सुरू असले तरीही प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या मान्य न झाल्याने संघर्ष कृती समिती पुन्हा आंदोलनाच्या तयारीत आहे. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या पत्रामुळे सध्या आंदोलक शांत असून ग्रामस्थांच्या बाजूने निर्णय न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार कृती समितीने केला आहे. यामुळे डिंगणी-जयगड रेल्वे मार्गाचा वाद आणखी वाढण्याची शक्‍यता आहे.

जयगड बंदराला रेल्वे मार्गाशी जोडून रेल्वे आणि बंदरांचे जाळे विणण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची घोषणा झाल्यापासूनच स्थानिकांच्या विरोधामुळे तो वादात अडकला आहे. या रेल्वे मार्गापुढचे अडथळे काही केल्या थांबत नाहीत. स्थानिकांचा विरोध डावलून डिंगणी येथे जोडपुलाचे, तर उपळे-मेढे भागात बोगद्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी ९ गावांची संघर्ष कृती समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीने दोन महिन्यांपूर्वीच ७०० ग्रामस्थांना घेत प्रकल्प विरोधी ठिय्या आंदोलन केले होते.

मोर्चेकरी जिल्हाधिकाऱ्यांच्या उत्तराच्या प्रतीक्षेत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांकडून अपेक्षित उत्तर आल्यास चर्चेला बसू, अन्यथा आंदोलनाची धार अधिक तीव्र करणार.
- सुदर्शन शरद मोहिते, 

ग्रा. पं. सदस्य

त्या वेळी संबंधित ठिकाणी सुरू असलेले काम बंद पाडण्यात आले. या आंदोलनानंतर काही दिवसांनी हे काम पुन्हा सुरू करण्यात आले. त्यानंतर ११ डिसेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून प्रकल्पाला विरोध करण्यात आला होता.

या मोर्चावेळी आंदोलकांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करून त्यामध्ये विविध प्रकारच्या ८ मागण्या केल्या होत्या. यामध्ये पूर्वीची संपादित जागेपासून स्थानिकांना नोकरीत सामावून घेणे, बाधित जमिनीचा योग्य मोबदला मिळणे अशा मागण्यांचा समावेश होता. या पत्रावर जिल्हाधिकारी यांनी २८ डिसेंबर २०१७ ला आपण कोकण रेल्वे आणि भूसंपादन विभागाकडून माहिती मागवून घेत असून त्यानंतर पुढील कार्यवाही करू, असे लेखी आश्‍वासन दिले. ११ डिसेंबरनंतर आंदोलन शांत झाल्याने स्थानिकांचा विरोध मिटल्याची चर्चा सुरू झाली होती. प्रत्यक्षात प्रकल्पग्रस्त अजूनही विरोधातच असून भविष्यात या मार्गासमोर अधिक अडथळे येण्याची शक्‍यता आहे.

Web Title: Ratnagiri News Dingani-Jaygad Railway issue