वृक्षतोड थांबावी यासाठी डॉक्‍टरमंडळी देणार विद्युतदाहिनी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 जानेवारी 2018

रत्नागिरी - रत्नागिरीमध्ये दहनासाठी लाकडे वापरली जातात. यासाठी वृक्षतोड किती केली जाते, याचा हिशेब मांडलेला नाही. ही वृक्षतोड थांबवावी, यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या रत्नागिरी शाखेने पालिकेला विद्युतदाहिनी देण्याचा निर्णय घेतला आहे.

रत्नागिरी - रत्नागिरीमध्ये दहनासाठी लाकडे वापरली जातात. यासाठी वृक्षतोड किती केली जाते, याचा हिशेब मांडलेला नाही. ही वृक्षतोड थांबवावी, यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या रत्नागिरी शाखेने पालिकेला विद्युतदाहिनी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी डॉ. नीलेश व डॉ. निनाद नाफडे यांनी लिहिलेल्या ‘आम्ही मुरलेले’ या नाटकाचे प्रयोग डॉक्‍टर मंडळी गावोगावी करणार आहेत. साधारणपणे दहा लाख रुपये दाहिनीसाठी उभे केले जाणार आहेत.

अंत्यसंस्कारावेळी दहन करताना लाकडांचा वापर होतो. प्रामुख्याने कोकणात होतोच होतो. त्यासाठी पालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्था मोफत लाकडे पुरवितात. त्यामुळे ती किती वापरायची, याचा सुमार राहत नाही. 

विद्युतदाहिनी देण्यास सर्व डॉक्‍टर मंडळींनी तत्काळ सहकार्य दिल्याने इंडियन मेडिकल असोसिएशन, रत्नागिरी शाखा हे काम तडीस नेणारच. दाहिनी दिल्यानंतर ती सुरू राहणे आणि त्यासाठीचा आवश्‍यक तो खर्च व उभारणी करण्यास रत्नागिरी पालिका व प्रामुख्याने नगराध्यक्ष श्री. पंडित यांनी तयारी दर्शवली आहे.
- डॉ. निनाद नाफडे

दहनासाठी लागणाऱ्या लाकडांसाठी जेवढी झाडे तोडली जातात, त्यापैकी दहा टक्केही नागरिक लावत नाहीत. अशा स्थितीत झाडे तोडणे थांबवायला हवे आणि तो थांबवायचा सोपा उपाय आहे तो विद्युत दाहिनी. रत्नागिरी हे जिल्ह्याचे ठिकाण असूनही येथे विद्युत दाहिनी नाही. ही त्रुटी लक्षात घेऊन डॉक्‍टरांच्या या चमूने हा निर्णय घेतला.

डॉक्‍टर नाफडे द्वयांचे वडील वारले त्यावेळी वडिलांना अग्नी देताना देवरूखमधील उघडे स्मशान आणि एकूण स्थिती पाहिल्यावर बदल झाला पाहिजे, असे त्यांना तीव्रतेने वाटले आणि मग तेव्हापासून काय करता येईल, याचा विचार सुरू झाला आणि नाटकाच्या प्रयोगातून पैसे उभे करून विद्युत दाहिनी देणगी द्यायची येथपर्यंत येऊन पोहोचला.

डॉ. निनाद व डॉ. नीलेश नाफडे या दोघांनी ‘आम्ही मुरलेले’ हे नाटक लिहिले. वृद्धाश्रमातील समस्यांवरील हे नाटक आहे. मात्र ते प्रचारकी नाही. अंतर्मुख करायला लावणारे विचार त्यामध्ये आहेत, असा दावा या दोघांनी केला आहे. नाटकाच्या प्रयोगासाठी येणाऱ्या प्रेक्षकांपर्यंत डॉक्‍टर मंडळी विधायक कामासाठी पैसे उभे करून विद्युत दाहिनी देणार आहेत आणि परंपरा बाजूला ठेवून वृक्षतोड थांबवायला हवी, त्यासाठी विद्युत दाहिनी हा एक उपाय ठरू शकतो असा संदेशही जाईल म्हणून नाटकाचा खटाटोप केला आहे.

‘आम्ही मुरलेले’....

‘आम्ही मुरलेले’चे दिग्दर्शन डॉ. निनाद यांनी केले असून त्यामध्ये नितीन चव्हाण, शशांक पाटील, स्वतः निनाद नाफडे, कृष्णा पेवेकर, रवींद्र गोंधळेकर, महेश भोगटे, नीलेश नाफडे, माधुरी पेवेकर, मेधा गोंधळेकर, मयूर कांबळे ही सर्व डॉक्‍टर मंडळी कलाकार आहेत. नाटकासाठी होणारा सारा खर्च डॉक्‍टर मंडळींनी सोसलेला आहे. नाट्यप्रयोगातून जमा होणाऱ्या एकूण रकमेतून नाटकावर होणाऱ्या खर्चासाठी एकही रुपया वजा केला जाणार नाही. सारीच्या सारी रक्कम दाहिनीसाठी वापरण्यात येणार आहे. नाटकाचा रत्नागिरीतील प्रयोग २१ जानेवारीला सावरकर नाट्यगृहात होणार आहे.

Web Title: Ratnagiri News doctor donation for electric crematorium