पशुगणना टॅब नसल्याने रखडली

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 नोव्हेंबर 2017

देवरूख - केंद्र शासनाने संगणकीकृत पद्धतीने पशुगणना करण्याचे आदेश दिले आहेत. ऑक्‍टोबर महिन्यामध्ये पशुगणना पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यासाठी टॅब उपलब्ध न झाल्याने २० वी पशुगणना रखडली आहे.

देवरूख - केंद्र शासनाने संगणकीकृत पद्धतीने पशुगणना करण्याचे आदेश दिले आहेत. ऑक्‍टोबर महिन्यामध्ये पशुगणना पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यासाठी टॅब उपलब्ध न झाल्याने २० वी पशुगणना रखडली आहे. केंद्राने पशुगणनेला आता मुदतवाढ दिली असली, तरी पुढील तारीख जाहीर केलेली नाही.

राष्ट्रीयस्तरावर प्रत्येक पाच वर्षांनी पशुगणना केली जाते. २० वी पशुगणना १७ जुलै २०१७ पासून करण्याचे आदेश देण्यात आले. त्यासाठी यावर्षी प्रथमच केंद्रशासनामार्फत इनाफ योजनेअंतर्गत ही गणना टॅबद्वारे करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये प्रगणक व पर्यवेक्षक जिल्हा परिषदेमार्फत देण्यात येणार असून, उर्वरित सर्व नियंत्रण राज्य पशुसवंर्धन विभागाचे राहणार आहे. 
 पशुगणनेची माहिती बिनचूक आणि लवकरात लवकर प्राप्त करणे पशुसंवर्धन विभागाला शक्‍य होणार होते. या टॅबद्वारे पशुसंवर्धन खात्याच्या विविध योजनांची माहिती आणि कृती कार्यक्रम यांचा अंतर्भावही करण्यात येणार होता, परंतु टॅबच उपलब्ध नसल्याने पशुगणना रखडली आहे.

केंद्र सरकार टॅब उपलब्ध करून देणार होते. मात्र, या निर्णयामध्ये बदल करून राज्यांनी टॅब खरेदी करावी, असे आदेश देण्यात आले होते. पूर्वी एका दवाखान्याच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या सर्व गावातील पशुगणना एका प्रगणकामार्फत केली जात होती. यात पशुगणनेसाठी खूप कालावधी लागत असे. १९ ऑक्‍टोबरपर्यंत पशुगणना करण्याचे आदेश होते. मात्र, टॅब उपलब्ध न झाल्याने गणनेचा कालावधी वाढविण्यात आला आहे. परंतु नोव्हेंबर महिना संपत आला तरी पुढील तारीख जाहीर न झाल्याने २० वी पशुगणना नक्‍की कधी होणार असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

Web Title: Ratnagiri News Domestic animals counting issue