डॉ. तपस भट्टाचार्य यांचा राजीनामा मंजूर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 जून 2018

दाभोळ - डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. तपस भट्टाचार्य यांनी दिलेला राजीनामा राज्यपालांनी स्वीकारल्याचे पत्र राजभवन येथून कुलगुरू कार्यालयात प्राप्त झाले आहे. ३

दाभोळ - डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. तपस भट्टाचार्य यांनी दिलेला राजीनामा राज्यपालांनी स्वीकारल्याचे पत्र राजभवन येथून कुलगुरू कार्यालयात प्राप्त झाले आहे. ३१ ऑगस्टपर्यंत नवीन कुलगुरूंची निवड न झाल्यास या विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा अतिरिक्त कार्यभार जवळच्या म्हणजे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीच्या कुलगुरूंकडे सोपविला जाण्याची शक्‍यता आहे. 

कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. तपस भट्टाचार्य यांनी १ जूनला तडकाफडकी राजीनामा दिला होता. मुदतपूर्व राजीनामा 
देणारे भट्टाचार्य हे कोकण कृषी विद्यापीठातील पहिलेच कुलगुरू आहेत. भट्टाचार्य यांचा राजीनामा ३१ ऑगस्टपासून अंमलात येणार आहे. राजभवनमधून ११ जूनला राजीनामा स्वीकारल्याचे राज्यपालांचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल यांच्या सहीचे पत्र विद्यापीठाला प्राप्त झाले आहे.

कुलगुरुपदाच्या शोधासाठी एका नामवंत व्यक्‍तीच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात येईल. अर्ज मागविण्यात येतील. त्यानंतर मुलाखतीनंतर पाच जणांच्या नावांची शिफारस राज्यपालांकडे करण्यात येईल. राज्यपाल त्यांची मुलाखत घेऊन एकाची निवड करतील. डॉ. भट्टाचार्य यांनी मुदतपूर्व राजीनामा दिल्याने कुलगुरुपदाच्या निवड प्रक्रियेसाठी सुमारे १५  लाख रुपयांचा खर्च असून हा सर्व खर्च कोकण कृषी विद्यापीठाला करावा लागणार आहे. 

राज्यपाल भेटीचा विषय विरोधामुळे बारगळला
डॉ. भट्टाचार्य यांचा राजीनामा स्वीकारू नये यासाठी कर्मचारी वर्गातील एक वर्ग सक्रिय झाला होता. त्यांचे काम चांगले असल्याने राज्यपालांची भेट घेऊन त्यांच्याकडे राजीनामा स्वीकारू नये, अशी विनंती करण्यात येणार होती. मात्र कर्मचाऱ्यांतूनच विरोध झाल्याने हा विषय थांबला.

काहींच्या आशा पल्लवीत
डॉ. भट्टाचार्य यांनी राजीनामा दिल्याने विद्यापीठातील काहींच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत. त्यांनी आता ही संधी आपल्यालाच मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
 

Web Title: Ratnagiri News Dr Tapas Bhattacharya resign