आणीबाणीत तुरुंगवास भोगलेल्या संगमेश्वरातील तिघांना पेन्शन योजनेचा लाभ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 जून 2018

देवरूख - आणीबाणीच्या काळात ज्यांनी तुरुंगवास भोगला अशा व्यक्‍तींसाठी शासनाने पेन्शन योजना सुरू केली आहे. संगमेश्‍वर तालुक्‍यात या काळात अनेकांनी तुरुंगवास भोगला; मात्र त्यातील तीनच व्यक्‍ती हयात असल्याने त्यांना याचा लाभ मिळणार आहे.

देवरूख - आणीबाणीच्या काळात ज्यांनी तुरुंगवास भोगला अशा व्यक्‍तींसाठी शासनाने पेन्शन योजना सुरू केली आहे. संगमेश्‍वर तालुक्‍यात या काळात अनेकांनी तुरुंगवास भोगला; मात्र त्यातील तीनच व्यक्‍ती हयात असल्याने त्यांना याचा लाभ मिळणार आहे.

दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी जाहीर केली होती. यामध्ये संगमेश्‍वर तालुक्‍यातील ६ जणांना १६ महिन्यांचा तुरुंगवास भोगावा लागला होता. यातील ३ व्यक्‍ती सध्या हयात आहेत. या व्यक्‍तींना शासनाने पेन्शन योजना लागू केली आहे. आणीबाणीच्या काळात तुरुंगात जात देशात शांतता ठेवण्याचे काम ज्यांनी केले त्यांचा सन्मान सरकारने केल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. तालुक्‍यातील बंडोपंत हळबे, वामनराव मुळ्ये, सदाशिव उर्फ बाबल्याशेठ सार्दळ, प्रभाकर भिडे, मुकुंद जोशी आणि शामकांत अळवणी हे १८ डिसेंबर १९७५ ते २१ एप्रिल १९७७ या काळात नाशिकमधील सेंट्रल जेलमध्ये होते.

यातील हळबे, मुळ्ये आणि सार्दळ यांचे निधन झाले असून जोशी, भिडे आणि अळवणी हे तिघे हयात आहेत. शासनाने पोलिसांकडून अशा व्यक्‍तींचा शोध घेऊन त्यांची नावे सुचविण्याची मोहीम हाती घेतली असली तरी संगमेश्‍वर तालुक्‍यात अशा प्रकारची एकही व्यक्‍ती नाही, असा अहवाल देण्यात आल्याचे समजते. प्रत्यक्षात आणीबाणीत ६ जणांनी तुरुंगवास भोगला असून त्यातील ३ व्यक्‍ती हयात असल्याची माहिती पोलिसांनी खातरजमा करून घ्यावी, अशी मागणी होत आहे. 

मुकुंद जोशी बापटांसमवेत 
संगमेश्‍वर तालुक्‍यातील अनेकांनी तुरुंगवास भोगला. मात्र सध्या हयात असलेल्या लोकांची नावेच शासन दरबारी उपलब्ध नव्हती व तसा अहवाल निरंक म्हणून पाठवला गेला. देवरूखमधील भाजप नेते मुकुंद जोशी यांनी आणीबाणी काळात तुरुंगवास भोगला. तसे त्यांना पुरावे देऊन सिद्ध करण्याची वेळ आली. तुरुंगात त्यावेळी सध्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापटही जोशी यांच्या समवेत होते. देवरूखमधील एका जाहीर कार्यक्रमात ही बाब खुद्द गिरीश बापट यांनी सांगितली होती.

Web Title: Ratnagiri News Emergency period prisoners have pension scheme