खडपोली आैद्योगिक वसाहतीमध्ये रसायनांच्या गोदामाला भीषण आग

मुझफ्फर खान
शनिवार, 3 मार्च 2018

चिपळूण - गाणे-खडपोली (ता. चिपळूण) औद्योगिक वसाहतीतील कृष्णा अँटीऑक्‍सिडेंट कंपनीच्या गोदामात आज स्फोट झाला आणि त्यानंतर गोदामातील रसायने भरलेल्या पिंपांनी पेट घेतला. त्यामुळे भीषण आग लागली.​

चिपळूण - गाणे-खडपोली (ता. चिपळूण) औद्योगिक वसाहतीतील कृष्णा अँटीऑक्‍सिडेंट कंपनीच्या गोदामात आज स्फोट झाला आणि त्यानंतर गोदामातील रसायने भरलेल्या पिंपांनी पेट घेतला. त्यामुळे भीषण आग लागली. त्यात कंपनीचे संपूर्ण गोदाम व मोटार खाक झाली. सुमारे साडेतीन तासांनंतरही आग आटोक्‍यात आली नव्हती. आगीपासून रक्षण करण्यासाठी नजीकच्या लोकांना इतरत्र हलविण्यात आले. गोदामात कोणते रसायन होते. याबाबतची माहिती आगीनंतर सहा तासांनीही कळली नव्हती. 

आग मोठ्या प्रमाणात लागली आहे.

आगीत जीवितहानी झाली नाही. आगीच्या काळात धुराचे लोट पसरून संपूर्ण परिसर गडद काळा झाला होता. गाणे-खडपोली औद्योगिक वसाहतीतील कृष्णा अँटीऑक्‍सिडेंट या कंपनीत फॅटी ॲसिड व विविध रसायनांची निर्मिती केली जाते. ही रसायने पिंपात भरून गोदामात ठेवली जातात. कंपनीपासून दीडशे मीटरवर असलेल्या गोदामात दुपारी तीनला स्फोट झाला. क्षणातच स्फोटाचे आगीत रूपांतर झाले आणि संपूर्ण गोदाम खाक झाले.

आगीची माहिती मिळाल्यानंतर पोफळी महानिर्मिती कंपनीचे अधिकारी व कर्मचारी तीन अग्निशमन बंब घेऊन घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन बंबांमधील पाणी संपल्यानंतर पुन्हा 
त्याच गाड्या पाणी भरण्यासाठी जात होत्या. त्यामुळे आग विझविण्याच्या प्रक्रियेत खंड पडत होता. त्या दरम्यान आगीचा भडका वाढत होता. त्यामुळे तब्बल साडेतीन तास आग विझविण्याचे प्रयत्न सुरू होते; मात्र त्याला यश आले नाही. 

उपविभागीय अधिकारी डॉ. शीतल जानवे, तहसीलदार जीवन देसाई, पोलिस निरीक्षक निशा जाधव, सहायक पोलिस निरीक्षक बडे नाईकवाडी यांनी घटनास्थळी धाव घेतली. डॉ. जानवे यांनी कंपनीत लागलेली आग जीवितहानीस कारणीभूत ठरू नये, यासाठी संपूर्ण परिसरात प्रवेश बंदी केली. आग वाढू नये म्हणून मानवी वस्तीचा परिसर ओला करण्यात आला. जवळच असलेल्या अडरेकर मोहल्ल्यातील ग्रामस्थांचे अन्य ठिकाणी तात्पुरते स्थलांतर करण्याची सूचना देण्यात आली. 

जिल्हा परिषदेचे सदस्य विनोद झगडे यांना कंपनीच्या गोदामाजवळ बॅरेलने भरलेला एक ट्रक दिसला. ट्रकचालक नसल्याने स्थानिकांनी वेगवेगळ्या किल्ल्या लावून ट्रक सुरू करण्याचा प्रयत्न केला. अखेर एका किल्लीने ट्रक सुरू झाल्यावर अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तो ट्रक बाजूला काढला. कंपनीतील पाटील या अधिकाऱ्याचे चारचाकी वाहन जळून खाक झाल्याची माहिती सुरक्षारक्षकाने दिली. 

घटनास्थळी उपस्थित असलेल्या कामगार, ठेकेदारांना केमिकलचे नाव, आग लागल्यानंतर होणारे परिणाम याबाबत माहिती नव्हती. त्यामुळे पोलिस व अग्निशमन दलाला परिस्थिती हाताळताना अडचणींचा सामना करावा लागला. दुपारी तीन ते सायंकाळी साडेसहापर्यंत अधिक हानी होणार नाही, याची दक्षता पोलिसांनी घेतली. दरम्यान, रत्नागिरी येथूनही रत्नागिरी पालिका आणि फिनोलेक्‍स कंपनीचा बंब चिपळूणला रवाना झाला होता. कंपनीचे मालक व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी आल्यानंतर पुढील चित्र स्पष्ट होणार आहे. 

दुपारी तापमान ४१ अंशांवर
खडपोली परिसरातील तापमान आज दुपारी १२ वाजता ३९ डिग्री सेल्सिअस होते. दुपारी तीन वाजता अचानक ४१ डिग्री सेल्सिअस इतके झाले. वाढलेल्या तापमानामुळे कंपनीच्या गोदामात स्फोट झाल्याची चर्चा परिसरात होती. कंपनीकडून आगीची माहिती देण्यासाठी कुणीही उपलब्ध नव्हते.

 

Web Title: Ratnagiri News Fire in Khadpoli MIDC