गोव्यात नेणारी मच्छी मुंबईसह कर्नाटककडे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 फेब्रुवारी 2018

रत्नागिरी - मच्छी विकत घेण्यास गोव्यातील विक्रेत्यांकडून नकार मिळाल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील पंधरा कोटींची उलाढाल थांबली आहे. सलग तीन दिवस हे व्यवहार बंद झाले आहेत. याला पर्याय म्हणून रत्नागिरीकरांनी ही मासळी मुंबई, पुणे, कर्नाटकला वळवली आहे.

रत्नागिरी - मच्छी विकत घेण्यास गोव्यातील विक्रेत्यांकडून नकार मिळाल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील पंधरा कोटींची उलाढाल थांबली आहे. सलग तीन दिवस हे व्यवहार बंद झाले आहेत. याला पर्याय म्हणून रत्नागिरीकरांनी ही मासळी मुंबई, पुणे, कर्नाटकला वळवली आहे. त्याचा परिणाम मच्छीमारांच्या नफ्यावर झाला आहे. तसेच बाजारातील मच्छीचे दरही तीस ते पन्नास टक्‍क्‍यांनी घसरले आहेत.

महाराष्ट्राच्या हद्दीत येऊन मासेमारी करणाऱ्या गोव्यातील मच्छीमारी नौकांची मालवण येथे धरपकड झाली. यामध्ये मालवणमधील स्थानिक मच्छीमार आक्रमक झाले होते. ही कारवाई स्थानिक मच्छीमारांकडून करण्यात आली होती. 
गोव्यातील मच्छी व्यावसायिकांनी दरोड्याची तक्रार दाखल केली होती.

दृष्टिक्षेपात

  •  तीन दिवस गोव्यातील व्यवहार थांबले

  •  मच्छी दर ५० टक्‍क्‍यांनी घसरले

  •  प्रशासनाकडून लक्ष घालण्याची गरज

  •  नफ्यावर परिणाम

गोवा विरुद्ध महाराष्ट्र असा वाद गेले काही दिवस रंगला आहे. ताब्यात घेतलेल्या नौकांना तहसीलदारांनी सोडून दिले असले तरीही गोव्यातील मच्छी व्यावसायिक आक्रमक झाले आहेत. कोकणातील अनेक व्यावसायिक दुय्यम दर्जाची मासळी गोव्याकडे पाठवितात. त्यात लेप, बांगडा, सौंदाळे, खेकडे, सुरमईचा समावेश असतो. या अलिखित निर्णयानंतर रत्नागिरीतील मच्छीमारांनी गोव्यात गाड्या न पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. 

गेले तीन दिवस मिरकरवाडा, हर्णै, नाटे, जयगड येथून जाणारी पूर्ण वाहतूक थांबलेली आहे. रत्नागिरी ते गोवा अंतर कमी असल्याने वाहतुकीचा खर्च कमी होतो. तोच मुंबई, पुण्यासह कर्नाटकला अधिक होतो. त्याचा परिणाम व्यावसायाच्या नफा-तोट्यावर होतो. रत्नागिरी जिल्ह्यातून प्रतिदिन दीडशे गाड्या मच्छी गोव्याकडे जाते. गेल्या तीन दिवसात सुमारे पंधरा कोटीची मासळी गोव्यात पाठविण्यात आली नसल्याचे मच्छीमारांकडून सांगण्यात आले.

या परिस्थितीचा फटका मच्छीमारांना बसणार आहे. गोव्यातून निर्यातही केली असल्याने त्याचा फायदा मच्छीमारांना होत असे. मच्छीचे दरही घसरले आहेत. लेपाच्या किमती किलोला ४० ते ५० रुपये, सौंदाळे १०० ते ५० रुपये किलो, सुरमई ५०० रुपये किलो, कुर्ली एका जाळीला पाचशे रुपये, बांगडा १०० रुपये किलोने मिळत आहे. सध्या मच्छीमारांनी आपला मोर्चा अन्यत्र वळविला असला तरीही गोव्याकडील मार्केट कायमस्वरूपी बंद राहिले तर मोठा फटका बसू शकतो असा अंदाज व्यक्‍त केला जात आहे.

मच्छी घटली
वेगवान वारे वाहत असल्यामुळे मासेमारीत अडथळा निर्माण झाला आहे. मच्छी कमी असून बंदरावरील उलाढाल घटली आहे. त्यामुळे गोव्याकडील व्यावहार ठप्प झाल्याचा उद्रेक जास्त प्रमाणात दिसून आलेला नाही.

Web Title: Ratnagiri News Fish marketing issue